राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष फुटल्याने राजकीय भूकंप झाले. परिणामी ही दोन्ही प्रकरणं निवडणूक आयोग आणि मग सर्वोच्च न्यायालयात गेले. सध्या राष्ट्रवादी पक्षनाव आणि पक्षचिन्हाचा तिढा निवडणूक आयोगात आहे. अजित पवार गटाने पक्षावर दावा करत निवडणूक आयोगात याचिका केली होती. याप्रकरणी सुनावणी सुरू असून आज (९ नोव्हेंबर) शरद पवार गटाने बाजू मांडली. शरद पवार गटाकडून ज्येष्ठ वकिल अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तीवाद केला. तर, सुनावणी वेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. सुनावणी संपल्यानंतर अभिषेक मनु सिंघवी यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.

“निवडणूक आयोगात आता दीड तास सुनावणी झाली. या सुनावणीत आमच्याकडून युक्तीवाद सुरू झाला. आम्ही खूप चमत्कारीत तथ्य निवडणूक आयोगासमोर ठेवले. जे दस्तावेज याचिकाकर्त्यांनी निवडणूक आयोगात दाखल केले होते, त्यापैकी २० हजार प्रतिज्ञापत्रात त्रुटी आढळल्या आहेत. तर, ८ हजार ९०० प्रतिज्ञापत्रांची चार्ट बनवून निवडणूक आयोगात सादर केले आहेत. यामध्ये भ्रष्ट, विकृत पद्धतीने दस्तावेज आणि प्रतिज्ञापत्रात त्रुटी आढळल्या आहेत”, असा दावा सिंघवी यांनी केला.

“मृत व्यक्तींचेही प्रतिज्ञापत्र यात आहेत, अल्पवयीन मुलांचंही प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे. एनसीपीच्या संविधानात नसलेली पदेही दाखवण्यात आलं आहे. गृहिणी, झोमॅटोचा सेल्समन दाखवून प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे. याप्रकारे २४ कॅटगिरी बनवल्या आहेत. यामार्फत आम्ही स्पष्ट केलं की हे चुकीच्या पद्धतीने प्रतिज्ञापत्र बनवण्यात आले आहे. याचा अर्थ अजित पवार गटाकडे कोणतंही समर्थन नाही. आता पुढची सुनावणी २० नोव्हेंबरला होणार आहे. त्यामुळे बनावट प्रतिज्ञापत्र सादर केल्याप्रकरणी अजित पवार गटावर कारवाई करण्याची आम्ही मागणी करणार आहोत. चुकीची विधानं, चुकीची प्रतिज्ञापत्र दिल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे”, असं सिंघवी म्हणाले.

अजित पवार गटाची प्रतिक्रिया काय?

निवडणूक आयोगासमोर आजपासून नियमित सुनावणी चालू होणं अपेक्षित होतं. पण काही किरकोळ शपथपत्रांमधल्या तांत्रिक बाबी समोर करून शरद पवार गटाकडून सुनावणी लांबवण्याचा प्रयत्न केला आहे. पण आता २० नोव्हेंबरपासून सलग सुनावणी होईल, असं सूचित करण्यात आलं आहे, अशी प्रतिक्रिया अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांनी दिली.

Story img Loader