महापालिका शिक्षण मंडळाने आयोजित केलेल्या ७७ हजार विद्यार्थ्यांच्या सहलींसाठी जी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली, त्यात अनेक नियमबाह्य़ गोष्टी झाल्याच्या तक्रारीत तथ्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रक्रियेत काही त्रुटी राहिल्या, त्या पुढील वर्षी दूर केल्या जातील, त्यावेळी चुका होणार नाहीत, असा दावा मंडळातर्फे मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आला.
महापालिका शिक्षण मंडळातील ७७ हजार ३०० विद्यार्थ्यांच्या सहली आयोजित करताना मंडळाने अनेक गैरव्यवहार केल्याची लेखी तक्रार विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी आयुक्तांकडे केली होती. या सहलींसाठी मोठी उधळपट्टी करतानाच निविदा प्रक्रियेतही अनेक गडबडी करण्यात आल्या असून ठेकेदारांनी संगनमत करून मंडळाचे नुकसान केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या तक्रारीबाबत मंडळातर्फे मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन म्हणणे मांडण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष प्रदीप ऊर्फ बाबा धुमाळ, उपाध्यक्ष नरेंद्र व्यवहारे, शिक्षण प्रमुख शिवाजी दौंडकर तसेच अन्य सदस्य उपस्थित होते. या सहलींसाठी तीन वेळा निविदा प्रक्रिया राबवावी लागली तसेच आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी तरतूद खर्च करणे आवश्यक होते. त्यामुळे वर्ष संपताना सहली काढाव्या लागल्या. ही प्रक्रिया राबवताना काही त्रुटी राहिल्या, अशी कबुली यावेळी दौंडकर यांनी दिली. मात्र, मंडळाचे आर्थिक नुकसान झालेले नाही, असाही दावा त्यांनी केला. निविदा प्रक्रिया पूर्णत: पारदर्शक असावी यासाठी यापुढे ई टेंडरिंग पद्धत सुरू केली जाणार असल्याचेही ते म्हणाले.
सहल आयोजनासाठी कालावधी फारच कमी होता. त्यामुळे आयोजनासाठी कमी वेळ मिळाला. मात्र, कोणाच्याही नातेवाईकांना वा हितसंबंधीयांना काम देण्यात आले नव्हते. त्यात कोणताही गैरव्यवहार झालेला नाही, असा दावा धुमाळ यांनी यावेळी केला.
दबाव आणल्याचा आरोप
दरम्यान, ग्रीन सिटी लॉजिस्टिक्स सोल्युशन या कंपनीचे संचालक किरण देसाई आणि राजन जुनावणे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन मंडळाचे सदस्य लक्ष्मीकांत खाबिया यांनी सहल आयोजनाचे काम सोडून देण्याबद्दल त्यांच्यावर दबाव आणल्याचा आरोप केला.
या आरोपाबाबत खाबिया यांना विचारले असता ते म्हणाले की, मी कोणताही दबाव आणलेला नाही. निविदेतून माघार घेतल्याचे पत्र संबंधित कंपनीनेच आम्हाला दिले आहे आणि एवढे दिवस संबंधित संचालक का गप्प होते, याचा खुलासा त्यांनी करावा.

Story img Loader