चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यातील जलजीवन मिशन योजनेच्या कामांचे कोट्यावधी रुपये आता पाण्यात जाण्याची वेळ आली आली. जिल्ह्यातील जलजीवन मिशन योजनेची २५ टक्के देखील कामे पुर्ण न झाल्याने या कामांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी आता आमदार भास्कर जाधव यांनी केली आहे. जिल्ह्यातील जलजीवन मिशन योजनेचा बोजवारा उडाल्याची तक्रार गुहागरचे आ. भास्कर जाधव यांनी राज्याच्या पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केली आहे. मात्र याआधीही चौकशीचे आश्वासन देऊनही कोणतीही कार्यवाही न झाल्याबद्दल आ. जाधव यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील जलजीवन मिशन योजनेच्या अर्धवट कामांबाबत ७ फेब्रुवारी २०२४ रोजी मंत्रालयात बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत २५ टक्के कामेही पूर्ण न झाल्याचे उघड झाले होते. ही कामेकोणताच अनुभव नसलेल्या ठेकेदारांना शंभर कोटींची कामे देण्यात आली आहेत. तसेच झालेल्या कामांचा दर्जा चांगला नसून याकडे जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत, असे आ. जाधव यांनी बैठकीत दाखवून दिले होते.
आणखी वाचा-संभाजी महाराजांचा पुतळा उभारणी रोखणारे तुम्ही कोण- शिवेंद्रसिंहराजे
याच बैठकीत जीवन प्राधीकरणचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक डॉ. अमित सैनी यांनी ही वस्तूस्थिती मान्य केली होती. यावेळी डॉ. सैनी यांनी प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार नेमलेले असताना अनेक योजना जि.प.ने आपल्याकडे घेतल्या आहेत. जि. प.ला योजना पूर्ण होण्यासाठी अभियंते व कर्मचारी घ्या असे सांगूनही ते घेण्यात आलेले नाहीत. याबाबत झालेल्या बैठकीत पाणीपुरवठा मंत्र्यांनी नाराजी व्यक्त करीत काम न करणाऱ्या ठेकेदारांना तत्काळ काढून टाकण्याचे आदेश दिले होते व कामाच्या तपासणीसाठी मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता यांचे पथक गुहागरसह जिल्ह्यात पाठविण्याचे आदेशही दिले होते. परंतु गत वर्षात यावर कोणतीही कार्यवाही वा चौकशी झाली नाही. परिणामी या योजनेची कामे अर्धवटच आहेत. अनेक ठिकाणी झालेली कामे निकृष्ट झाली असून शासनाचे शेकडो कोटी रूपये पाण्यात गेले आहेत, असे आ. जाधव यांनी सांगितले.