सोलापूर: साखर उद्योगासाठी विख्यात ठरलेल्या सोलापूर जिल्ह्यात यंदा पावसाळी हंगामाने निराशा केली असली तरी एकूण ४१ पैकी ३७ साखर कारखान्यांनी ऊस गाळप हंगाम सुरू करण्याची तयारी केली आहे. त्यासाठी साखर संचालकांकडे परवानेही मागितले आहेत. यंदा ऊस लागवड क्षेत्र गतवर्षीपेक्षा जास्त असले तरी प्रत्यक्ष ऊस उत्पादन घटण्याची शक्यता असल्यामुळे ऊस उपलब्ध होण्यासाठी साखर कारखान्यांना कसरत करावी लागणार आहे. यात किती कारखाने तग धरतील हे पुढील महिन्यातच स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, येत्या १ नोव्हेंबरपासून गळीत हगाम सुरू होण्याची अपेक्षा गृहीत धरून सोलापूर जिल्ह्यातील बहुसंख्य साखर कारखान्यांनी धीराडे पेटविले आहे. सर्वाधिक गाळपात अग्रेसर असलेल्या माढा तालुक्यातील पिंपळनेरच्या विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने सर्व शाखांसह यंदा २५ लाख मे. टन ऊस गाळप करण्याचे नियोजन हाती घेतले आहे. या कारखान्याच्या अग्निप्रदीपन सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारहे येत्या २३ ऑक्टोंबर रोजी येणार आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदे हे या साखर कारखान्याचे सर्वेसर्वा आहेत. अकलूजच्या सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याने दहा लाख मे. टन ऊस गाळप उद्दिष्ट ठेवले आहे.

हेही वाचा… “माझ्या बॅगेत आठ शर्ट, एकावर शाई फेकली की दुसरा घालतो आणि तिसऱ्या मिनिटाला…”, चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य

सदाशिवनगरचा शंकर सहकारी साखर कारखाना, श्रीपूरचा सुधाकरपंत परिचारक सहकारी साखर कारखाना यांसह सोलापूरचा सिध्देश्वर, उत्तर व दक्षिण सोलापूर तालुक्यातील सिध्दनाथ, लोकमंगल, जयहिंद, गोकुळ, मंगळवेढ्यातील संत दामाजी, युटोपियन, अक्कलकोट तालुक्यातील मातोश्री लक्ष्मी, माढा तालुक्यातील म्हैसगावचा विठ्ठल शुगर, करमाळा तालुक्यातील आदिनाथ, कमलादेवी आदी बहुसंख्य साखर कारखाने गाळप हंगामासाठी सज्ज झाले आहेत.

हेही वाचा… कंत्राटी नोकर भरती रद्द केल्याने युवकांची नाराजी दूर करण्यात सत्ताधाऱ्यांना यश येणार का ?

यंदा जिल्ह्यात दोन लाख ४० हजार हेक्टर क्षेत्र ऊस लागवडीसाठी नोंदले गेले आहे. गत वर्षी दोन लाख ३० हजार हेक्टर क्षेत्रात ऊस लागवड झाली होती. यंदा दहा हजार हेक्टर ऊस क्षेत्र जास्त असले तरी प्रत्यक्षात पावसाळ्याने निराशा केल्यामुळे ऊस उत्पादन किमान ३० हजार हेक्टरपर्यंत घटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. उसाचे वजन घटण्याची चिन्हे असल्यामुळे साखर उता-यावर आणखी परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Story img Loader