जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने बहिणाबाई चौधरींच्या जीवनावर आधारित काव्यकन्या बहिणाबाई या कार्यक्रमाचे आयोजन उद्या, दि. ८ मार्च रोजी करण्यात आले आहे.  बँकेतील अधिकारी स्मिता काटकर, महिला कक्षाच्या निरीक्षक सुजाता दर्शणे, पद्मिनी पडळकर आदींनी ही माहिती दिली.
जिल्हा बँक केवळ व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून कार्यरत आहे असे न समजता सामाजिी स्तरावरही बँकेची असणारी बांधिलकी लोकांच्या समोर यावी यासाठी चालू वर्षी महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांना बँकेच्या विविध सेवा देत असताना सामाजिक उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने महिला दिनाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
शनिवारी बँकेच्या मुख्य कार्यालयात दुपारी महिला मेळावा होणार असून या मेळाव्यात मार्गदर्शन करण्यासाठी विविध क्षेत्रात कार्यरत असणा-या महिलांना निमंत्रित करण्यात आले आहे. महापालिका क्षेत्रात जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या दहा शाखा कार्यरत असून या शाखातील महिला कर्मचारी बँक संलग्न असणा-या बचत गटातील महिला या वेळी उपस्थित राहणार आहेत.
महिला मेळाव्यातच पुण्याच्या कुंदा प्रधान यांचा काव्यकन्या बहिणाबाई हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. श्रीमती प्रधान बहिणाबाईंच्या कवितांसह त्यांचा जीवनपट या कार्यक्रमामधून मांडणार आहेत.  जिल्ह्यातील २२ हजार महिला बचत गट व या बचत गटाच्या ३ लाख महिला सदस्या बँकेशी जोडल्या गेल्या आहेत. त्यांना ९८ कोटींचे अर्थसाहाय्य बँकेने उपलब्ध करून दिले आहे.

Story img Loader