काही दिवसांपूर्वी पुण्यात शरद पवार आणि अजित पवार यांच्यात झालेल्या गुप्त भेटीमुळे महाविकास आघाडीमध्ये संभ्रम वाढला आहे. शरद पवारांशिवाय महाविकास आघाडी आगामी निवडणूक लढणार असल्याचं बोललं जात आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात बैठकही घेतली आहे, त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचं चित्र आहे.
दुसरीकडे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आदेश दिले आहेत. बारामती मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी शिवसेनेकडून (ठाकरे गट) चाचपणी केली जात असल्याचं बोललं जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निवडणुकीआधी सर्वच पक्ष सर्वच जागांवर दावा सांगतो, हा एक वाटाघाटी करण्याचा भाग आहे, अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली. ते छत्रपती संभाजीनगर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
हेही वाचा- “मी काँग्रेस हायकंमाडच्या संपर्कात, पण महाराष्ट्रातील…”, सुप्रिया सुळेंचं विधान
काँग्रेस पक्षाने निवडणुकीसाठी सुरू केलेल्या हालचालींबाबत विचारलं असता रोहित पवार म्हणाले, “प्रत्येक निवडणुकीआधी असंच घडतं. हे केवळ आताच घडतंय असं नाही. प्रत्येक विधानसभा निवडणुकीआधी प्रत्येक पक्षांकडून सर्वच २८८ जागांवर दावा सांगितला जातो. हा वाटाघाटीचा भाग आहे. पण कोणत्याही पक्षाने आज केलेला दावा अंतिम असतो, असं नाही. त्यावर चर्चा होत असते. त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जातो.
हेही वाचा- “कोण कुणाला कोंडीत पकडतंय, हे…”, शरद पवारांच्या बीडमधील सभेवरून धनंजय मुंडेंचा सूचक इशारा
“वंचित बहुजन आघाडीकडून सर्वच २८८ जागांवर दावा केला जातो. प्रकाश आंबेडकरांना खूप मोठा वारसा आहे. त्याचा आपल्या सर्वांना अभिमान आहे. पण त्यांच्या पक्षाने घेतलेल्या भूमिकेमुळे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे भाजपाला फायदा होतो. त्यामुळे सर्वांना विचार करण्याची गरज आहे. आता सर्वांनी एकत्र येऊन भाजपाविरोधात लढण्याची गरज आहे. त्यामुळे एखाद्या मतदारसंघावर दावा सांगणं हा वाटाघाटीचा भाग आहे. हे सगळ्यांनी समजून घेणं महत्त्वाचं आहे”, असंही रोहित पवार म्हणाले.