लोकसंख्या नियंत्रण कायदा आपल्या देशात येत नाही तोपर्यंत प्रत्येक सनातनी कुटुंबाने पाच ते सहा मुलांना जन्म द्यावा असं वक्तव्य देवकीनंदन ठाकूर महाराजांनी केलं आहे. देवकीनंदन ठाकूर महाराज नागपूरमध्ये श्रीकृष्ण कथा सांगण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. भारतात लोकसंख्येचा एवढा मोठा स्फोट झाला की कुणी विचारही करू शकत नाही. चार बायका आणि चाळीस मुलं यावर कुणीच काही बोलत नाही असंही देवकीनंदन ठाकूर महाराज यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
नेमकं काय म्हटलं आहे देवकीनंदन महाराजांनी?
माझे म्हणणे आहे की, जोपर्यंत लोकसंख्या नियंत्रण कायद्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत प्रत्येक सनातनी कुटुंबाने कमी-अधिक प्रमाणात मुले जन्माला घालायला हवीत. पाच-पाच, सहा-सहा मुलं व्हायची. यासाठी मुला मुलींनी वेळेवर लग्न केलं पाहिजे.तसंच पाच ते सहा मुलांना जन्म दिला पाहिजे असंही त्यांनी म्हटलं आहे. आपला देश पुढच्या दहा वर्षात हिंदू राष्ट्र आणि सनातनी धर्म मानणारा देश झाला नाही तर २५ वर्षांनी काय होईल तुम्हाला ठाऊक नाही? आज लोकं आपल्याला ऐकवतात. २५ वर्षांनी हा देश सेक्युलर राहिल का? यामागचं वास्तव ठाऊक असेल तरच मी काय म्हटलं आहे याचा अर्थ समजेल असंही देवकीनंदन ठाकूर यांनी म्हटलं आहे. येणाऱ्या पिढीसाठी आपल्याला काही विचार करायचा आहे की नाही? असंही ते म्हणाले आहेत.
देवकीनंदन ठाकूर महाराज यांनी सनातन मंडळ स्थापन करण्याची मागणी केली आहे. आज अनेक ठिकाणी वक्फबोर्ड आहेत. त्यामुळे सनातन बोर्ड स्थापन करावे. या मंडळात सनातन धर्माचार्य असतील. मात्र केंद्र सरकारने हे याला आपल्या देखरेखीखाली ठेवावेत.
आपण किती राज्यांमध्ये अल्पसंख्य आहोत याचा विचार करा. आपण किमान ९ राज्यांमध्ये अल्पसंख्य आहोत मात्र आपल्याला असं कुणी म्हणतही नाही. सरकार हिंदुत्ववादी असो किंवा इतर कुठल्या विचारांचं असो आपल्या अधिकारांची मागणी आपण आपल्या सरकारकडेच केली पाहिजे असंही देवकीनंदन महाराजांनी म्हटलं आहे.
आपला देश सनातन परंपरा मानणाराच देश आहे. ७५ वर्षांपूर्वी आपण सेक्युलर झालो पण सनातन संस्कृती संपलेली नाही. सनातन धर्म आहेच ना. तो कुणाला विरोध करत नाही. सनातन बोर्ड स्थापन झाले पाहिजेत ही मागणी मी पाच वर्षांपूर्वी केली होती. जजही आमचा, वकीलही आमचा, अधिकारही आमचा असं कसं काय चालेल? सनातन परंपरा आपल्या सनातनी संस्कृती पाळणाऱ्यांपर्यंत गेली पाहिजे यासाठी बोर्ड हवं. यावर सरकारचं नियंत्रण हवंच असंही देवकीनंदन यांनी म्हटलं आहे.