अनेक सरकारी दवाखान्यांतून लस उपलब्धच नाही
नगर : जिल्ह्य़ात दरवर्षी किमान ५० हजारावर श्वानदंशाच्या घटना घडतात. हे प्रमाण मोठे आहे, त्यामुळे श्वानदंश प्रतिबंधक लसींना मोठीच मागणी आहे. मात्र सरकारी दवाखाने व रुग्णालयांतून या प्रतिबंधक लसींचा (अँटी रेबीज डोस व अँटी रेबीज सिरप) गेल्या काही महिन्यांपासून तुटवडा जाणवत आहे. जिल्हा रुग्णालय, महापालिका, जिल्हा आरोग्य विभाग यांनी राज्य सरकारकडे मागणी नोंदवली, त्याला किमान तीन ते चार महिन्यांचा कालावधी लोटला, मात्र अद्याप पुरवठा झालेला नाही. अनेक ठिकाणच्या सरकारी दवाखान्यातून ही लस उपलब्धही नाही. सरकारी दवाख्यात ही लस मोफत उपलब्ध होते. बाजारात या लसींची किंमत ३५० ते ६०० रुपये असल्याचे समजले. हा तुटवडा केवळ नगर जिल्ह्य़ातच नाही तर राज्यभर असल्याचे आरोग्य विभागाचे अधिकारी सांगतात.
श्वानदंशामुळे गेल्या वर्षी ब्राह्मणी (ता. राहुरी) येथील एका महिलेचा मृत्यू झाल्याची अधिकृत नोंद जिल्हा रुग्णालयात आहे तर कर्जतमधील एका पंधरा वर्षांच्या विद्यार्थ्यांचा मृत्यू पंधरा महिन्यांपूर्वी झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. जिल्हा रुग्णालय, महापालिकेचे नगर शहरातील दवाखाने, ग्रामीण रुग्णालये, जिल्हा परिषदेची प्राथमिक आरोग्य केंद्रे अशा सर्वच ठिकाणी श्वानदंश प्रतिबंधक लसींचा तुटवडा जाणवत आहे, केवळ तुटवडाच नाही तर अनेक ठिकाणी ती उपलब्धही नाही. या सर्व ठिकाणचे आरोग्याधिकारी याला दुजोरा देत आहेत. गेल्या फेब्रुवारी २०१८ पासून कोणत्याही औषधांची खरेदी आता थेट बाजारातून करता येत नाही, त्यामुळे श्वानदंश प्रतिबंधक लसींच्या पुरवठय़ासाठी प्रथम दरकरारावरील मुंबईतील हाफकिन संस्थेकडे मागणी नोंदवावी लागते, नंतरच पुरवठा होतो. भटक्या व पाळीव कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या, हल्ला केल्याच्या घटना जिल्ह्य़ात दरवर्षी हजारोंच्या संख्येने घडतात. अनेक शहरांतून भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. नगर शहरात हा उपद्रव अधिक आहे. नगर शहरात महापालिकेच्या केवळ तोफखाना दवाखान्यात श्वानदंश प्रतिबंधक लस उपलब्ध केली जाते. नागरिकांना यासाठी जिल्हा रुग्णालयावर अवलंबून रहावे लागते. सध्या तोफखान्याच्या दवाखान्यात ही लस शिल्लक नाही. महापालिकेने गेल्या मार्च व एप्रिल अशा दोन महिन्यात ४०० डोसची मागणी नोंदवली होती, मात्र अद्याप पुरवठा झालेला नाही.
जिल्हा सरकारी रुग्णालयात दरमहा ३ ते ४ हजार डोसची आवश्यकता भासते मात्र तेथे केवळ १०० डोस शिल्लक आहेत. रुग्णालयाने ५ हजार डोसची मागणी नोंदवली होती, मात्र राज्य सरकारकडून केवळ ९५० डोसचा पुरवठा झाला. तोही दीड महिन्यांपूर्वी. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला दरवर्षी किमान ४२ हजार डोसची आवश्यकता भासते. राज्य सरकारने पुरवठा आदेश दोन महिन्यांपूर्वी जारी केला, प्रत्यक्षात पुरवठा झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्य़ातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रात लस उपलब्ध नाही. जिल्ह्य़ातील ९६ प्राथमिक आरोग्य केंद्रांतून सन २०१६ या वर्षांत श्वानदंशाच्या ५२ हजार ४, सन २०१७ मध्ये ३८ हजार ३५८ तर एप्रिल ते मे २०१८ दरम्यान १८ हजार ६६२ घटना घडल्याची नोंद आहे. सन २०१७-१८ या वर्षांत जिल्हा रुग्णालयातून ६ हजार ५९७ (नगर शहरासह) तर ग्रामीण रुग्णालयातून २२ हजार २९६ घटनांची नोंद आहे. एप्रिल व मे २०१८ या दोन महिन्यांत जिल्हा रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालयात ४ हजार १६० श्वानदंश झाल्याच्या नोंदी आहे.
श्वानदंश प्रतिबंधक लसींच्या पुरवठय़ासाठी राज्य सरकाकडे मागणी नोंदवण्यात आली आहे. लवकरच पुरवठा होण्याची शक्यता आहे. सध्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना आवश्यकता भासल्यास रुग्ण कल्याण समितीमार्फत बाजारातून खरेदी करण्यास सांगण्यात आले आहे.
-डॉ. संदीप सांगळे, जिल्हा आरोग्यधिकारी, जिल्हा परिषद
महापालिकेच्या दवाखान्यात लस उपलब्ध नसल्याने रुग्णांना त्यासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले जाते. लसीसाठी मागणी नोंदवण्यात आली आहे. मात्र अधिक माहिती स्टोअर किपरलाच असेल. परंतु लसींचा तुटवडा जाणवत आहे.
-डॉ. अनिल बोरगे, आरोग्यधिकारी, मनपा
सर्वच श्वानदंशासाठी लस घेण्याची आवश्यकता नसते, मात्र भीतीपोटी रुग्ण त्याची मागणी करतात. कुत्रा पिसाळला असेल, पॉझिटिव्ह टेस्ट आली तरच सात डोस घेण्याची आवश्यकता असते. खासगी डॉक्टर अनेकदा रुग्णांना याची माहिती न देता लस देतात. दंशाची दाहकता लक्षात घेऊन डोस देण्याची गरज आहे. लसींचा सध्या तुटवडा जाणवत असला तरी रुग्ण कल्याण समितीमार्फत खरेदी करण्यास सांगण्यात आले आहे.
-डॉ. मुरांबीकर, जिल्हा शल्य चिकित्सक