अनेक राजकीय घडामोडींनंतर राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झालं. मात्र, त्यानंतर देखील नाट्यमय घडामोडी संपण्याचं नाव घेत नाहीयेत. शिवसेना खासदार संजय राऊत हे बंडखोर आमदारांच्या निशाण्यावर आले आहेत. संजय शिरसाट, दीपक केसरकर, शहाजीबापू पाटील, अब्दुल सत्तार अशा अनेक बंडखोर आमदारांनी संजय राऊतांवर टीका केली आहे. टीकेचं हे सत्र अद्याप कायम आहे.

दरम्यान संजय राऊत यांनी सूचक ट्वीट करत बंडखोर आमदारांवर निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये स्वत:चा फोटो शेअर करत त्यासोबत भारतातून पाकिस्तानात स्थलांतरीत झालेले सुप्रसिद्ध उर्दू कवी सय्यद हुसेन उर्फ जॉन एलिया यांच्या काही ओळी ट्वीट केल्या आहेत. “अब नहीं कोई बात खतरे की, अब सभी को सभी से खतरा है..”, अशा ओळी त्यांनी ट्वीट केल्या आहेत.

या ट्वीटचा नेमका अर्थ काय? याचा उलगडा संजय राऊत यांनी स्वत:च केला आहे. त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, “हे भविष्यात कळेलच की कुणाला कुणापासून धोका आहे. आम्हाला कुणापासूनही धोका नाही. जे व्हायचं होतं, ते होऊन गेलं. पण भविष्यात कुणीही राजकारणात स्वत:ला सुरक्षित समजू नये. आता सगळ्यांच्याच हातात खंजीर आहेत. त्यामुळे आता प्रत्येकाला प्रत्येकापासून धोका आहे”, असं संजय राऊत यांनी कुणाचंही नाव न घेता टीकास्त्र सोडलं आहे.

हेही वाचा- “..अब सभी को सभी से खतरा है”, संजय राऊतांचं सूचक ट्वीट; एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांना केलं टॅग!

दरम्यान, बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी संजय राऊतांवर टीका करताना म्हटलं की, “संजय राऊत हे शिवसेना संपवायला निघाले आहेत. त्यांना नेमकं कुणाशी काय बोलावं, कसं बोलावं, हे कळत नाही. हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. पण याची दखल उद्धव ठाकरे अथवा आदित्य ठाकरे यांनी घ्यायला पाहिजे. उद्या ते उद्धव ठाकरेंवर देखील टीका करायला कमी करणार नाहीत. जोपर्यंत शिवसेना संपत नाही, तोपर्यंत असंच बोलायचं, अशी सुपारी संजय राऊतांनी घेतली असावी,” असंही शिरसाट म्हणाले.

Story img Loader