गेल्या काही दिवसांच्या राजकीय घडामोडींनतर अखेर जनता दलचे (संयुक्त) प्रमुख नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. नितीश कुमार यांनी काही वेळापूर्वी राजभवन येथे जाऊन राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. नितीश कुमार आता भारतीय जनता पार्टीबरोबर राज्यात सरकार स्थापन करणार आहेत. लवकरच ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील, तर भाजपा नेते सुशीलकुमार मोदी यांची उपमुख्यमंत्री नेमणूक केली जाऊ शकते. नितीश कुमारांच्या या रणनीतीमुळे इंडिया आघाडीला आणखी एक धक्का बसला आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नितीश कुमार यांनीच इंडिया आघाडीची मोट बांधली होती. इंडिया आघाडीची पहिली बैठक बिहारमध्येच नितीश कुमारांच्या नेतृत्त्वाखाली झाली होती. तसंच, इंडिया आघाडीकडून पंतप्रधान पदाच्या चेहऱ्यासाठी नितीश कुमारांचा विचार सुरू होता. परंतु, ऐन लोकसभा निवडणुकीच्या वेळी नितीश कुमारांनी आपली भूमिका बदलली असून भाजपाबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या निर्णयामुळे इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला आहे. ममता बॅनर्जी आणि आपने स्वतंत्र निवडणूक लढवण्याच्या निर्णयानंतर नितीश कुमारांनीही इंडिया आघाडीतून एक्जिट घेतल्याने इंडिया आघाडीच्या भविष्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. यावरून सुप्रिया सुळे यांनी आज माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा >> Bihar Political Crisis : नितीश कुमारांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, भाजपासह सरकार स्थापन करणार
“इंडिया आघाडीत प्रत्येकजण आपआपल्या परीने काम करत आहे. ही आमची वैयक्तिक लढाई नसून वैचारिक लढाई आहे. दिल्लीत दडपशाही होत आहे, यंत्रणेचा गैरवापर करून सत्ता फोडणे, घरे फोडण्याचं काम सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे. याचा आम्ही जाहीर निषेध करतोय. या दडपशाहीविरोधात आमची लढाई सुरूच राहणार”, असा इशारा सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारला दिला आहे.
नितीश कुमारांनी दिला राजीनामा
राजीनामा देऊन राजभवनाबाहेर पडलेल्या नितीश कुमार यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना याबाबतची माहिती दिली. नितीश कुमार म्हणाले, मी नुकताच माझ्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. तसेच राज्यपालांना सांगितलं आहे की, राज्यातलं विद्यमान सरकार विसर्जित करावं. मला महाआघाडी (महागठबंधन) तोडण्याबाबत चारही बाजूंनी सल्ले मिळत होते, त्यानुसार मी आज राजीनामा दिला आणि विद्यमान सरकार विसर्जित केलं आहे.