अजित पवार जर आता बोलले तर मला वेगळा विषय मांडावा लागेल. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर कुणीही आडवं आलं तर मी ऐकून घेणार नाही असं मनोज जरांगे पाटील म्हटलं आहे. अजित पवारांचं ज्ञान सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे, असंही जरांगे पाटील म्हणाले आहेत.
काय म्हणाले मनोज जरांगे?
अजित पवारांचं ज्ञान सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. त्यांनी ग्रंथ का लिहिना आम्हाला काय करायचं आहे? मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलू नका. तुमचं आणि आमचं काही वैर आहे का? मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलल्यावर मी कुणालाच सोडत नाही. माझ्या कुटुंबाला सोडत नाही तर तुम्ही कोण लागून गेलात? असाही प्रश्न मनोज जरांगे पाटील यांनी विचारला आहे.
पाच महिने काही बोललो का?
दुसरं काही असेल तर आमचा कान धरा, पण मराठा आरक्षणाबाबत कुणी आम्हाला सुनवू नये. अजित पवार आणि आमचं काही वैर नाही. तुम्हाला ज्ञान आहे, तुमच्याकडे भरपूर ज्ञान आहे. आमचंही घेऊ नका तुम्हीही बोलू नका. आम्ही तुम्हाला बोललो का पाच महिने? तुम्ही कुठे गेलात? एखाद्या मठात किंवा आश्रमात गेलात का? आम्ही विचारलं का? नाही ना. तुम्ही शांत राहा आम्ही शांत राहतो. नाहीतर मग दुसरा विषय हाताळावा लागेल. माझ्या पोरांचं वाटोळं होऊ देऊ नका.
अजित पवार तुम्ही इकडे का गेले? तिकडे का गेले आम्ही विचारलं का? मराठ्यांनी तुम्हाला निवडून दिलं असं आम्ही म्हटलं आहे का? मग आमच्याबाबत काही बोलू नका असंही जरांगे पाटील म्हणाले. आता गोरगरीब मराठे एकत्र आले आहेत. आत्ता पूर्वीचे मराठे नाहीत, आत्ता त्यांच्यात बदल झालाय ते थेट कार्यक्रमच करतील कारण आमचा नाईलाज आहे, तुम्ही काहीही बोललात तर ऐकणार नाही. कुणी मोठे असाल किंवा लहान असाल मराठा आरक्षणावर बोलू नका. आम्ही आमचं काय ते बघतो असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.