समाजातील सर्व घटकांना अल्प दरात योग्य उपचार देण्याच्या ध्येयाने सुरू झालेल्या श्री गुरुजी रुग्णालयाचे कार्य पुढील काळातही निरंतरपणे सुरू राहणे आवश्यक आहे. त्याची जबाबदारी आपल्या सर्वावर असून या कामात सर्वाचे हातभार लागणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान संचालित श्रीगुरुजी रुग्णालयाच्या नूतन वास्तूचे उद्घाटन शुक्रवारी डॉ. भागवत यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते.
गंगापूर रस्त्यावरील आनंदवल्ली चौकात झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राचे संचालक अरुण नंदा उपस्थित होते. या वेळी भागवत यांनी या कामात सक्रिय राहिलेल्या सर्व सदस्यांना आपल्या जबाबदारीची जाणीव करून दिली. पाच एकर जागेत ८० खाटांची रुग्णालयाची वास्तू उभारण्यात आली आहे. या आरोग्य भवनची उभारणी झाली म्हणजे आपली जबाबदारी संपली असे नव्हे तर, या ठिकाणी रुग्ण सेवेचे काम अविरतपणे सुरू राहील याकरिता सगळ्यांचे हातभार लागणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. नव्या युगात समाजाला अनेक नव्या सवयी लागल्या आहेत. एखादे काम करावयाचे असेल तर त्यासाठी माणूस नेमायचा, ही सवय त्यापैकीच एक. म्हणजे कोणतेही काम स्वत: न करता त्याची जबाबदारी दुसऱ्यावर टाकायची. या रुग्णालयात सेवा देण्यासाठी अनेक तज्ज्ञ डॉक्टरांनी तयारी दर्शविली आहे. रुग्णसेवेची ही प्रक्रिया अव्याहतपणे सुरू राहील याकरिता डॉक्टरांबरोबरच प्रत्येक घटकाचे सक्रिय योगदान गरजेचे आहे. प्रत्येकाने समाजासाठी काम करण्याची आवश्यकता असल्याचे भागवत यांनी नमूद केले. याप्रसंगी स्थानिक समितीचे अध्यक्ष डॉ. विनायक गोविलकर, डॉ. राजेंद्र खैरे, डॉ. भारत देशमुख व डॉ. अनिल भालेराव आदी उपस्थित होते.

Story img Loader