शरद पवार जोपर्यंत आदेश देत नाहीत तोपर्यंत औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवणार ही अफवाच ठरेल असे स्पष्ट मत आमदार सतीश चव्हाण यांनी व्यक्त केले आहे. लोकसत्ता ऑनलाइनशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. दरम्यान लोकसभेच्या ठराविक जागांवर काही उमेदवारांचे शिक्कामोर्तब झाल्याची माहीती समोर येत आहे.
शुक्रवारी शरद पवारांनी दिवसभर मुंबईत लोकसभा उमेदवारांची चाचपणी घेतली. रायगड, कोल्हापुर, बीड, परभणी, उस्मानाबाद आणि जळगाव या ठिकाणी काही उमेदवार निश्चित करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. यामधे रायगड मधून सुनिल तटकरे, रावेर मधून संतोष चौधरी, बीडसाठी जयदत्त क्षीरसागर, उस्मानाबादमधून राणा जगजितसिंग, कोल्हापुरातून धनंजय महाडिक या नावांवर शिक्कामोर्तब झाले असल्याचं कळत आहे.
तर परभणीसाठी बाबाजानी दुर्राणी आणि फौजियाखान या दोघांपैकी एकाचं नाव अंतिम करण्यात येणार आहे. जळगाव मधून देवकर आणि सतीश पाटील यांनी नकार दिल्याने नवीन नावांचा शोध घेतला जात आहे. पण जर एकनाथ खडसे गळाला लागले तर रावेर मधून आमदार चौधरींना बाजूला केलं जाण्याची शक्यता आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीचं ४० जागांवर एकमत, ८ जागांचा निर्णय बाकी
आगामी लोकसभा निवडणूकांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी व मित्रपक्षांनी एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील ४८ जागांपैकी ४० जागांबाबत एकमत झाले आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी याबाबत माहिती दिली. आगामी लोकसभा निवडणूकांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी हे मित्रपक्ष एकत्र लढणार असून जागावाटप चर्चेत आतापर्यंत ४० जागांबाबत एकमत झाले आहे. असे प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले आहे. अद्याप आठ जागांवर निर्णय बाकी असून चर्चेद्वारे त्यावरही लवकरच तोडगा निघेल असं त्यांनी म्हटलंय.