जिल्ह्य़ाबाहेरचा उमेदवार हीच प्रमुख पक्षांची जालन्याची परंपरा. जालना लोकसभा मतदारसंघात पक्षाने जिल्ह्य़ातील उमेदवार द्यावा यासाठी काँग्रेसची काही नेतेमंडळी प्रयत्नशील होती आणि त्यामध्ये अन्य इच्छुकांसोबत जिल्हा काँग्रेस अध्यक्ष भीमराव डोंगरे यांचे प्रमुख नाव होते. परंतु काँग्रेसने औरंगाबाद जिल्ह्य़ातील विलास औताडे यांना उमेदवारी दिली. पुनर्रचनेनंतर जालना लोकसभा मतदारसंघात औरंगाबाद जिल्ह्य़ातील तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश झालेला आहे. औताडे हे औरंगाबाद जिल्ह्य़ातीलच नव्हे तर लोकसभा मतदारसंघाच्या बाहेरील असल्याची टीका आता भाजपमधून सुरू झाली आहे.
पुनर्रचनेनंतर जिल्ह्य़ातील ६० टक्के भाग जालना लोकसभा मतदारसंघात तर ४० टक्के भाग परभणी लोकसभा मतदारसंघात गेलेला आहे. जालना जिल्हा स्वतंत्ररीत्या अस्तित्वात आल्यावर आणि त्यापूर्वीही या लोकसभा मतदारसंघावर सध्याच्या औरंगाबाद जिल्ह्य़ातील भागाचा प्रभाव विविध पक्षांच्या उमेदवारीबाबत राहिलेला आहे. या मतदारसंघात आतापर्यंत झालेल्या १६ निवडणुकांपैकी मागील १०-११ निवडणुकांकडे पाहिले तरी हे दिसून येते.
स्वतंत्र जालना जिल्हा अस्तित्वात येण्यापूर्वी १९७७ मध्ये जनता पक्षाकडून पुंडलिकराव दानवे विजयी झाले होते. त्यावेळचे पराभूत उमेदवार माणिकराव पालोदकर लोकसभा मतदारसंघाच्या बाहेरील नव्हते, परंतु औरंगाबाद जिल्ह्य़ातील होते. १९८० मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेले बाळासाहेब पवार हेही औरंगाबाद जिल्ह्य़ातील आणि मतदारसंघाच्याही बाहेरील होते. पुढे १९८५ मध्येही तेच निवडून आले होते आणि १९८९ मध्येही काँग्रेसने त्यांनाच उमेदवारी दिली होती. परंतु त्यांचा पराभव झाला होता. १९९६ आणि १९९८ मध्ये भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले उत्तमसिंह पवार यांचे मूळ गाव जालना लोकसभा मतदारसंघात असले तरी त्यांचे वास्तव्य आणि ओळख औरंगाबाद शहरातील रहिवासी अशीच होती. त्यांना २००४ मध्ये काँग्रेसने उमेदवारी दिली होती. परंतु त्यांचा पराभव झाला होता. २००९ मध्ये लोकसभा मतदारसंघाच्या बाहेरील नसलेले परंतु औरंगाबाद जिल्ह्य़ातील रहिवासी असलेले डॉ. कल्याण काळे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली होती. परंतु त्यांचा पराभव झाला. आता २०१४ मध्ये काँग्रेसकडून औरंगाबादचे कल्याण औताडे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. दरम्यान, १९९९ मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीत आघाडी नसताना राष्ट्रवादीकडून विजयअण्णा बोराडे उभे राहून पराभूत झाले होते. बोराडे यांचे मूळ गाव जालना जिल्ह्य़ातील असून पूर्वीपासून ते परभणी लोकसभा मतदारसंघात आहे. गेली अनेक वर्षे त्यांची ओळख औरंगाबादचे रहिवासी अशीच आहे. तात्पर्य मागील ११ पैकी १० निवडणुकीत जालना लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस, भाजप आणि राष्ट्रवादी या प्रमुख पक्षांचे उमेदवार उभे राहिलेले आहेत. १९७७ च्या आधी बाबुराव काळे, रामराव लोणीकर, अंकुशराव घारे, सय्यद तय्यबजी इत्यादी पाच जणांनी जालना लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे.

Story img Loader