लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघात मतदान संपण्यासाठी काही मिनिटे शिल्लक असताना करमाळा शहरात एका माथेफिरू तरूणाने एका मतदान केंद्रात चक्क हातोडी घालून ईव्हीएम मशीन फोडल्याची घटना घडली. संबंधित तरूणाला तात्काळ पकडून पोलिसांच्या हवाली करण्यात आले.

जयवंत दिलीप कांबळे (रा. करमाळा) असे संबंधित तरूणाचे नाव आहे. त्याच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री सुरू होती. माढा लोकसभा मतदारसंघाशी संबंधित करमाळा विधानसभा क्षेत्रात करमाळा शहरात नगरपालिका मुलांची प्राथमिक शाळा क्र. २ च्या इमारतीत मतदान केंद्रावर दिवसभर मतदानाची प्रक्रिया शांततेने सुरू होती. सायंकाळी मतदान संपायला शेवटची काही मिनिटे शिल्लक असताना काही मतदार रांगेत होते. त्यापैकी जयवंत कांबळे नावाचा तरूण मतदानाचा हक्क बजावण्यासाठी म्हणून मतदान केंद्रात गेला.

आणखी वाचा-सोलापुरात ५५ टक्के मतदानाचा अंदाज

सर्व औपचारिक प्रक्रिया पूर्ण करून तो ईव्हीएम मशीनजवळ गेला आणि हळूच पॅन्टच्या खिशातून हातोडी बाहेर काढून ईव्हीएम मशीनवर प्रहार केला. यात मशीन फोडली गेली. हातोडी मारल्याचा जोराचा आवाज येताच मतदान केंद्रात कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी कांबळे यास तात्काळ ताब्यात घेतले. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील, सहायक निवडणूक अधिकारी तथा करमाळ्याच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे, पोलीस निरीक्षक विनोद घुघे यांनी संबंधित मतदार केंद्राकडे धाव घेतली. ईव्हीएम फोडली असली तरी त्यालगतच्या व्हीव्ही पॅट मशीनवर दिवसभर झालेल्या मतदानाचा विदा (डाटा) सुरक्षित आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Evm machine was smashed with hammer in polling station in karmala mrj