अयोध्येतील राम मंदिरातील भगवान रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारी रोजी होणार आहे. त्यानिमित्ताने २२ जानेवारी रोजी दिवाळी साजरी करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. तसंच, या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देशभर उत्साहाचं वातावरण आहे. परंतु, हा सोहळा म्हणजे भाजपाकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सुरू असलेली प्रचारसभा असल्याचं म्हटलं जात आहे. तसंच, राममंदिर सोहळ्यानंतर देश लोकसभा निवडणुकांना सामोरा जाईल. त्यासाठीच मंदिर सोहळ्याचा घाट घातला गेला आहे. या संपूर्ण सोहळ्यात ‘फोकस’ फक्त पंतप्रधान मोदींवर राहील अशी योजना आहे, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली. दैनिक सामनातील रोखठोक सदरामधून त्यांनी ही टीका केली आहे.
संजय राऊत म्हणाले, अयोध्येतील राममंदिराचे भव्य उद्घाटन २२ जानेवारी रोजी होईल. देशाच्या दृष्टीने हा आनंद सोहळा आहे. पंतप्रधान मोदी या आनंद सोहळ्याच्या केंद्रस्थानी राहतील व त्या सोहळ्यानंतर लगेच भाजप लोकसभा निवडणुकांच्या दिशेने पावले टाकेल. श्रीरामाच्या धर्म सोहळ्याच्या तरंगत्या वातावरणातच लोकांकडून मतदान करून घ्यावे, असा विचार भाजपच्या प्रमुख नेत्यांनी केला असेल तर त्यात चुकीचे काहीच नाही. मोदी व शहा हे सर्व निर्णय ‘वेळ’ आणि ‘मुहूर्त’ पाहून घेतात. ३० एप्रिलनंतरचा काळ भाजपच्या दोन प्रमुख नेत्यांसाठी शुभ नाही, असे एका चांगल्या ज्योतिषाने टीव्हीवर येऊन सांगितले. त्यामुळे लोकसभा निवडणुका ३० एप्रिलच्या आधी आटोपून चांगला मुहूर्त साधावा असे घडू शकेल, पण तरीही ३० एप्रिलच्या नंतरचा अशुभ काळ ते कसा टाळणार? काळ गोठवण्याची किमया व ललाटावरचे भाग्य-अभाग्य बदलण्याचे तंत्र कोणाकडेच नाही. झाले तेवढे पुरे. देश एकदाचा भाजपमुक्त होवो, अशा भूमिकेत जनता आहे.
रामाचा आधार आणि ईव्हीएमची मदत
“राममंदिर सोहळ्यानंतर देश लोकसभा निवडणुकांना सामोरा जाईल. त्यासाठीच मंदिर सोहळ्याचा घाट घातला गेला आहे. या संपूर्ण सोहळ्यात ‘फोकस’ फक्त पंतप्रधान मोदींवर राहील अशी योजना आहे. रामाचा आधार व ‘ईव्हीएम’ची मदत अशा दोन पायांवर भाजपचा यशाचा डोलारा उभा आहे. विकासाच्या नावाने बोंब आहे. समाजातला कोणताही घटक सुखी नाही. हा अस्वस्थ समाज भाजपास मतदान करीत नाही. तरीही भाजप जिंकतो. त्यासाठी लोकसभा निवडणुकीआधी ईव्हीएमचा निकाल लावा”, असा आरोपही संजय राऊत यांनी केला.
ईव्हीएमचे हॅकिंग
“२०२४ च्याही निवडणुका ‘ईव्हीएम’वर घेतल्या गेल्या तर मोदी ४०० पेक्षा जास्त जागा जिंकून दाखवतील, असे सॅम पित्रोदांसारखे तज्ञ सांगत आहेत. भाजपास मध्य प्रदेशात १६३ जागा मिळणे शक्यच नव्हते. हा चमत्कार ‘ईव्हीएम’मुळे झाला हे आता सगळेच सांगतात. हे सर्व अगदी सहज घडवले जाते. लोकसभा आणि विधानसभेतील ३० ते ३५ टक्के मतदारसंघांतील ‘ईव्हीएम’चे हॅकिंग केले जाते. ईव्हीएम सोर्स कोड (Source Code) चे स्वतंत्र ऑडिटिंग झाले तर मशीनचा घोटाळा उघड होईल. ईव्हीएम हॅकिंग करून भाजप गेली काही वर्षे जिंकत आहे. त्यांना जिंकण्याची व मोदी यांच्या चमत्काराची, दैवी शक्तीची इतकी खात्री असेल तर मतपत्रिकेवर निवडणुका घ्यायला हव्यात. भाजपा त्या कधीच घेणार नाही”, अशीही टीका संजय राऊतांनी केली.
ईव्हीएम आहे तोपर्यंत…
“दूरसंचार क्षेत्रात काम करणारे एक तज्ञ मला भेटले. ते म्हणाले, ‘एका OTP मुळे एखाद्याचे संपूर्ण बँक खाते हॅक होऊ शकते. पृथ्वीवरील रिमोटने चंद्रयान, मंगलयान नियंत्रण करता येऊ शकते तर मग ईव्हीएम किस झाड की मूली?” भारतात ईव्हीएमवर निवडणुका घेणे हा धोका आहे. मतपत्रिकेवरच निवडणुका घ्यायला हव्यात. जोपर्यंत ईव्हीएम आहे तोपर्यंत भाजप आहे. ईव्हीएमवर विश्वास ठेवता येणार नाही, असे सॅम पित्रोदा का म्हणतात ते समजून घ्या”, असंही राऊत म्हणाले.
विष्णूचे तेरावे अवतार बॅलेटवर पेपरवर निवडणुका घ्यायला का घाबरतात?
“ईव्हीएम ही एक समस्या आहे व जगातील सर्व लोकशाही मानणाऱ्या देशांनी ‘ईव्हीएम’ पद्धती रद्द केली. मग भारतातच ईव्हीएमचा हट्ट का? मोदी यांच्या नेतृत्वाखाली अयोध्येत राममंदिर उभे राहिले. रामाचे बोट पकडून मोदी अयोध्येतील मंदिरात निघाले आहेत अशी पोस्टर्स सर्वत्र लागली. ज्यांच्यात श्रीरामास आधार देण्याचे बळ आहे व ज्यांना विष्णूचे तेरावे अवतार असे म्हटले जाते ते ‘बॅलट पेपर’ म्हणजे मतपत्रिकेस का घाबरत आहेत? ‘ईव्हीएम’कांड करण्याचे एक तंत्र आहे. आधी ओपिनियन पोलच्या माध्यमांतून विजयाचे ढोल वाजवले जातात आणि प्रत्येक राज्यात जेथे ‘कांटे की टक्कर’ आहे अशा मतदारसंघांत गुन्हेगारी पद्धतीचा अवलंब करून मते मिळवली जातात. एखादे तेलंगणा, कर्नाटक सोडून दिले जाते, हा खेळ आहे”, असं संजय राऊत म्हणाले.