भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार सुब्रह्मण्यम स्वामी हे कायमच त्यांच्या भूमिकांसाठी आणि वादग्रस्त विधानांसाठी चर्चेत असतात. असेच एक विधान त्यांनी शनिवारी पंढरपूरमध्ये केलं आहे. पंढरपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना स्वामींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना रावणाशी केली आहे. स्वामींच्या एका ट्विटसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता मोदींचा एकेरी उल्लेख करत मोदी फार अहंकारी असल्याचं ते म्हणाले.
डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर सरकार मुक्त करण्याबाबत चर्चा करण्यासाठी पंढरपूर येथे आले होते. या चर्चेनंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना त्यांनी मंदिरं सरकार ताब्यात घेणं चुकीचं आहे असं म्हटलं. आपला तीर्थक्षेत्र पंढरपूरमधील कॉरिडॉरला विरोध असल्याचं सांगताना त्यांनी येथील सर्व परिस्थिती आपण पाहिल्याचं म्हटलं. तसेच या कॉरिडॉरच्या नादात अनेक गोष्टींचं पाडकाम करावं लागणार असून स्थानिकांना त्याचा विरोध आहे. स्थानिकांचं मत लक्षात घेऊनच पुढे गेलं पाहिजे असं स्वामींनी आपली भूमिका मांडताना म्हटलं.
तसेच, पत्रकारांनी त्यांना मंदिरं सरकारमुक्त करण्याबाबत पंतप्रधानांची भेट घेणार का? असं विचारलं असता, “पंतप्रधान मोदी हे कोणाचेच ऐकत नसून ते हिंदुत्त्वावादी नाहीत, त्यांनी उत्तराखंडमधील सर्व मंदिरं आपल्या ताब्यात घेतली आहेत, ज्यांना असं वाटतं की पंतप्रधान मोदी चांगले काम करत आहेत, ते सर्व मोदींचे चमचे आहेत”, अशी प्रतिक्रिया स्वामी यांनी दिली. मोदींबद्दल केलेल्या एका ट्विटवरुन स्वामींना प्रश्न विचारण्यात आला असता रावणाचा अहंकारामुळे अंत झाला होता असं म्हणत त्यांनी मोदींबद्दलही भाष्य केलं.
नक्की वाचा >> “…आणि तो जास्त बोलला तर उपमुख्यमंत्रीही राहणार नाही”; देवेंद्र फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत BJP च्या माजी खासदाराचं विधान
तुम्ही मोदींची तुलना रावणाशी केली होती सर असं म्हणत पत्रकाराने स्वामींना त्यांच्या एका ट्विटबद्दल प्रश्न विचारला. त्यावर स्वामींनी “मी रावणाशी तुलना केली नव्हती. मी म्हटलं होतं की ‘लाइक’ रावण (रावणासारखे) याचा अर्थ असा होता की ते अहंकारामध्ये अनेक गोष्टी करत आहेत,” असं उत्तर दिलं. त्याचप्रमाणे पुढे स्वामींनी, “रावण तर मोदींपेक्षाही जास्त शिकलेला माणूस होता. ज्ञानी होता. पण तो अहंकारामुळे संपला. हा (पंतप्रधान नरेंद्र मोदी) पण अहंकारात कोणाचं ऐकत नाही,” असंही म्हटलं.