सध्या राज्यात सरकार नसून ती एक व्यवस्था आहे. आता त्यांनी शपथ घेतली आहे. तर त्यांनी काम करावं. आता डबल इंजिनच काम सुरू आहे त्यामुळे अन्याय होत असतो, अशीही टिप्पणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य सरकारवर केली. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या भारत जोडो यात्रेबाबत माहिती देण्यासाठी साताऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई, जिल्हा महिला अध्यक्षा अल्पना यादव, रजनी पवार, धनश्री महाडिक, ऍड. दत्तात्रय धनावडे, मनोहर शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
राज्यातील शाळा बंद करण्याचा निर्णय हे शिंदे-फडणवीस सरकार घेत आहे. या सरकारचे धोरण शिक्षण विरोधी आहे. आजच्या आज या सरकारने हा निर्णय मागे घ्यावा, अशी आमची मागणी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातच्या हिताचे आणि महाराष्ट्रावर अन्याय करणारे घेत आहेत. त्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुकसंमती देत आहेत. अनेक प्रकल्प गुजरातला जात आहेत. त्याबाबत ते ब्र शब्द काढत नाहीत. राज्यात पावसाने शेतकऱ्यांना हैराण केले आहे. शेतकरी जनता होरपळतोय याकडे सरकारचे लक्ष नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे मात्र सण उत्सव मोठया उत्साहाने साजरा यामध्ये दंग आहेत. त्यांनी ओला दुष्काळ जाहीर करावा अशी आमची मागणी आहे, असेही चव्हाण म्हणाले.
हेही वाचा- “…तर तुम्हाला आश्चर्य वाटेल,” शिंदे गट, भाजपातील पक्षप्रवेशावरून चंद्रशेखर बावनकुळेंचे मोठे विधान
निवडणूकीसाठी २०२० मध्ये पत्र आम्ही निवडणुकीबाबत पत्र दिले होते. त्यावेळी म्हटलं होतं .काँग्रेसला पूर्ण वेळ देणारा अध्यक्ष हवा. त्यानुसार अध्यक्ष खर्गे हे झाले आहेत. इतर निवडणूकाही होतील, असे सांगत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यापूर्वी २९ टक्के मते होती आज त्यांना जनाधार आहे पण इतर लोकांची मते एकत्रित झाली तर नरेंद्र मोदी यांचा पराभव शक्य आहे.२०२४च्या निवडणूकीत पराभव करण्यासाठी काँग्रेस लाच पुढाकार घ्यावा लागेल, असेही मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या भारत जोडो यात्र महाराष्ट्रात येत आहे. त्या यात्रेच्या अनुषंगाने सातारा जिह्यात एक चैतन्य निर्माण करायचे आहे. नांदेड आणि शेगाव येथे दोन सभा होणार आहेत. साताऱ्यातील कार्यकर्त्यांसाठी वेळ दिलेला असून मोठया संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते यात्रेत सहभागी होणार आहेत. महाराष्ट्रात ही यात्रा न भुतो न भविष्यती अशी होणार आहे. दरम्यान २०२४ ला पंतप्रधान मोदींचा पराभव करण्यासाठी काँग्रेस पुढाकार घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
भारत जोडो यात्रेला देशभारत चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही यात्रा महाराष्ट्रात येत आहे. नांदेड येथे या यात्रेचे भव्य स्वागत करण्याचे नियोजन झाले आहे. या यात्रेच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर गावागावात आपण वातावरण तयार करण्यात येत आहे. प्रत्येक पदाधिकारी या यात्रेच्या स्वागताला सज्ज झाला पाहिजे. यात्रेसाठी सातारा जिह्यातील मोठया प्रमाणावर कार्यकर्ते जायचे नियोजन आहे असे त्यांनी सांगितले.