Ex MLA Rajan Salvi : कोकणातील राजापूर विधानसभा मतदारसंघाचे तीनवेळा आमदार राहिलेले राजन साळवी २०२४ च्या विधानसभ निवडणुकीत पराभूत झाले. किरण सामंत यांनी त्यांना पराभवाची धूळ चारली. त्यामुळे एसीबीच्या रडारवर असलेले अन् विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले राजन साळवी आता शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षावर नाराज असल्याची चर्चा आहे. तसंच, ते लवकरच पक्ष सोडून इतर पक्षात स्थायिक होणार असल्याच्याही चर्चेला जोर आला होता. परंतु, या सर्व चर्चांवर राजन साळवी यांनी पत्रकार परिषद घेऊन पूर्णविराम दिला आहे.
“ठाकरेंचा निष्ठावंत सैनिक म्हणून माझी ओळख आहे. २०२४ च्या पराभावाला आम्ही सामोरे गेलो आहोत. पराभवाचं दुःख, खंत आणि वेदना माझ्यासकट माझ्या मतदारसंघातील सामान्य जनतेला आहे. पराभवाची खंत असताना भविष्याकडेही शिवसेना मार्गक्रमण करतेय. तुमच्या माध्यमातून मला समजतंय की मी नाराज आहे. भाजपा किंवा शिंदे गटाच्या वाटेवर आहे. पण तसं काही नाही. माझ्या रोजच्या कामात माझं मार्गक्रमण सुरू आहे. अशातऱ्हेच्या बातम्या अफवा आहेत. हा निष्ठावंत सैनिक बाळासाहेबांचाच राहणार. यात कोणतीही शंका नाही”, असं राजन साळवी म्हणाले.
भाजपा किंवा शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षात जाण्याच्या चर्चेवर राजन साळवी म्हणाले, “पिकल्या आंब्यावर दगड मारले जातात. तसा प्रयत्न भाजपाकडून केला गेला असेल. पण माझ्याशी कोणीही संपर्क झालेला नाही. पक्षात येणाऱ्या माणसाचं स्वागत करणं प्रत्येक पक्षप्रमुखाचं कर्तव्य असतं. पण मतदारसंघात आणि जिल्ह्यात माझ्या संघटनकौशल्यामुळे मी यावं असं वाटत असेल. त्यामुळे त्यांची अपेक्षा असेल.”
हेही वाचा >> Rohit Pawar : “बीड पोलीस ठाण्यात पाच नवे पलंग कशासाठी मागवले?”, रोहित पवारांचा सवाल; नेमका रोख कोणावर?
निवडणूक झाल्यानंतर वरिष्ठांनी संपर्क केला का?
पराभवानंतर पक्षश्रेष्ठीने संपर्क साधला नसल्याने राजन साळवी नाराज असल्याची चर्चा होती. या चर्चेवर राजन साळवी म्हणाले, “पराभवनानंयतर मुंबईतील मातोश्री येथे पराभूत उमेदवारांची बैठक घेतली होती. तिथे पराभवाचं कारण आणि आत्मचिंतन करण्यात आलं. तेच आमच्यादृष्टीने महत्त्वाचं आहे.”
एसीबी चौकशीमुळे आमच्यावर टांगती तलवार
“एसीबीची चौकशी सुरू होती. याबाबत उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्याकडून निर्णय सुट्टीनंतर अपेक्षित आहे. आमच्यावर टांगती तलवार आहे, हे मला निश्चितपणे माहितेय”, असंही ते पुढे म्हणाले.