सांगली : जतमधील भाजपचे माजी नगरसेवक विजय ताड यांच्या खूनप्रकरणी पोलीसांनी चौघांना अटक केली असून या खूनाचा मुख्य सूत्रधार भाजपचाच माजी उपनगराध्यक्ष उमेश सावंत असून तो फरार असल्याची माहिती पोलीस अधिक्षक बसवराज तेली यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत दिली.
ताड यांच्या मोटारीवर गोळीबार करून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना डोकीत दगड घालून हत्या करण्याचा प्रकार दि. १७ मार्च रोजी भरदिवसा घडला होता. या खून प्रकरणात सहभागी असलेले संशयित बबलू उर्फ संदीप शंकर चव्हाण (वय २७ रा.समर्थ कॉलनी जत), निकेश उर्फ दाद्या दिनकर मदने (वय २४ रा. मौजे डिग्रज, ता. मिरज), आकाश सुधाकर व्हनखंडे (वय २४ रा.के.एम. हायस्कूलजवळ, जत) आणि किरण विठ्ठल चव्हाण (वय २७ रा. राजेरामराव कॉलेजजवळ जत) यांना आज अटक करण्यात आली आहे. या सर्वाना आज न्यायालयात हजर केले असता सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले असल्याचे तपासाधिकारी निरीक्षक श्री. शिंदे यांनी सांगितले.
हेही वाचा >>> पैशाच्या वादातून नथुराम पवार यांची हत्या, प्रकरणाचा उलगडा करण्यात अलिबाग पोलिसांना यश
ताड याचा खून माजी नगराध्यक्ष सावंत याच्या सांगण्यावरूनच केल्याची कबुली संशयितांनी दिली असून सावंत हा परागंदा झाला आहे. त्याला पकडण्यासाठी दोन पथके रवाना करण्यात आली असून यामागील तोच सूत्रधार असल्याने खूनामागील कारण त्याच्याकडूनच कळणार आहे. पकडण्यात आलेले तिन संशयित सराईत असून त्याची नोंद पोलीस दप्तरी आहे. कर्नाटकातील गोकाक येथे चार संशयितांना पकडण्यात आले.
हेही वाचा >>> जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने १, ४०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक सतीश शिंदे, जतचे निरीक्षक राजेश रामाघरे, सहायक निरीक्षक प्रशांत निशाणदार, उप निरीक्षक विशाल येळेककर, संदीप नलवडे, प्रशांत माळी, संजय कांबळे, ऋतुराज होळकर, अमोल ऐदळे, सचिन धोत्रे आदींसह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक यांनी संयुक्त कारवाई करीत चौघांना अटक केली असल्याचेही श्री. तेली यांनी सांगितले. या खूनाचा तपास निरीक्षक शिंदे हे करीत आहेत.