राज्यातील तंत्रशिक्षण ‘पॉलिटेक्निक’ अभ्यासक्रमाच्या परीक्षेला यावर्षी पेपर फुटीचे ग्रहण लागले असून, प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वीच विकल्या जात असल्याचे उघडकीस आले आहे. ‘बेसिक मॅथेमॅटिक्स’ या विषयाची प्रश्नपत्रिका औरंगाबाद येथे फुटल्यामुळे या विषयाची परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची सूचना महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने शनिवारी सर्व परीक्षा केंद्रांना दिली.
राज्यातील तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या हिवाळी सत्र परीक्षा सध्या सुरू आहेत. ‘बेसिक मॅथेमॅटिक्स’ या विषयाची परीक्षा होती. सकाळी साडेनऊ ते साडेबारा या वेळेमध्ये परीक्षा होणार होती. मात्र, या परीक्षेची प्रश्नपत्रिका परीक्षेच्या आधीच विद्यार्थ्यांना विकली जात होती. ही प्रश्नपत्रिका शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमाराला एका संकेतस्थळाच्या लिंकचे मेल महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांना आले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी मेलमार्फत आलेली प्रश्नपत्रिका आणि दुसऱ्या दिवशी असलेल्या परीक्षेची प्रश्नपत्रिका रात्री पडताळून पाहिली. त्या वेळी ई-मेलमार्फत आलेली प्रश्नपत्रिका जशीच्या तशी होती. प्रश्नपत्रिका फुटल्याचे उघड झाल्यानंतर शनिवारी सकाळी परीक्षा पुढे ढकलल्याचे तंत्रशिक्षण मंडळाकडून सर्व विभागीय मंडळांना कळवण्यात आले. प्रथम सत्राला सर्व शाखांना ‘बेसिक मॅथेमॅटिक्स’ हा विषय बंधनकारक आहे. राज्यातून साधारण दीड हजार विद्यार्थी या विषयाची परीक्षा देणार होते.
याप्रकरणी औरंगाबाद येथील क्रांती चौक पोलीस ठाण्यात तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक संदीप विश्वरूपे यांनी फिर्याद दिली. दरम्यान, रात्री फुटलेल्या पेपरची तब्बल आठ हजार रुपयांना विक्री झाली असल्याची चर्चा आहे.
यापूर्वी १२ नोव्हेंबरला तंत्रशिक्षण पदविकेच्या द्वितीय सत्राची गणिताची (अ‍ॅप्लॅईड मॅथेमॅटिक्स) परीक्षा झाली. या विषयाचीही प्रश्नपत्रिकाही जळगाव येथे फुटली होती. परीक्षा झाल्यानंतर प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वीच विद्यार्थ्यांच्या हाती पडल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे या विषयाची झालेली परीक्षा रद्द करण्याचा निर्णय तंत्रशिक्षण मंडळाने १४ नोव्हेंबरला घेतला. ‘अ‍ॅप्लॅईड मॅथेमॅटिक्स’ या विषयाची परीक्षा ४ डिसेंबरला सकाळी ९.३० ते १२.३० या वेळेत आणि ‘बेसिक मॅथेमॅटिक्स’ या विषयाची परीक्षा ४ डिसेंबरला  दुपारी २ ते ५ या वेळेत होणार आहेत.
इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रमेंट्स अँड मेजरमेंट या विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या असल्याची चर्चा सध्या विद्यार्थ्यांमध्ये आहे. परीक्षेपूर्वी साधारणपणे आठशे रुपयांना या चारही विषयांच्या प्रश्नपत्रिकांची विक्री झाल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.  मात्र, बाकीच्या दोन विषयांप्रमाणे या विषयांच्या परीक्षांमध्ये काहीही बदल करण्यात आलेले नाहीत. यापूर्वी २००२ साली मंडळाच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे मंडळाला परीक्षा पुन्हा घ्यावी लागली होती.
चौकशीचा नुसताच फार्स?
जळगाव येथे पहिल्यांदा फुटलेल्या प्रश्नपत्रिकेबाबत अजूनही कोणताही धागादोरा सापडलेला नाही. प्रश्नपत्रिका फुटल्याचे लक्षात आल्यानंतर त्याचा तत्काळ शोध घेतला असता, तर दोषी सापडले असते आणि पुढची परीक्षा सुरळीत झाली असती. मात्र, प्रश्नपत्रिका फुटत असल्याचे लक्षात येऊनही मंडळाकडून आणि पोलिसांकडून कारवाई होत नसल्याची टीका विद्यार्थी आणि शिक्षकांकडून होते आहे.
“शुक्रवारी रात्री मेलवर दुसऱ्या दिवाशीची प्रश्नपत्रिका मिळाल्यानंतर ती रात्रभर ताडून पाहिली. प्रश्नपत्रिका फुटल्याचे सिद्ध झाल्यानंतर सर्व विभागीय कार्यालयांना आणि परीक्षा केंद्रांना परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची सूचना देण्यात आली. यापूर्वी फुटलेल्या आणि शनिवारी फुटलेल्या प्रश्नपत्रिकेबाबत पुढील चौकशी सुरू आहे.’’
प्रमोद नाईक, संचालक, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ