शहरातील क. का. वाघ महाविद्यालयातून एकाच वेळी चोरीला गेलेल्या सुमारे दीडशे भ्रमणध्वनीच्या तपास प्रक्रियेत परीक्षेचा अडथळा निर्माण झाला आहे. भ्रमणध्वनी चोरीला गेल्याची निवेदनाद्वारे तक्रार देणारे विद्यार्थी व पोलिसांची बुधवारी भेट होऊ शकली नाही. गुरुवारी पेपर असल्याने विद्यार्थ्यांनी अभ्यासाला महत्त्व देत हा पेपर झाल्यावर तपास यंत्रणेची भेट घेणार असल्याचे म्हटले आहे. परिणामी, तक्रारदाराकडून योग्य ती माहिती न मिळाल्याने उपरोक्त घटनेचा तपास पुढे सरकू शकला नाही.
‘मेकॅनिकल’च्या द्वितीय वर्षांतील विद्यार्थी मंगळवारी पेपर सोडविण्यात मग्न असताना अज्ञात चोरटय़ाने सुमारे १५० विद्यार्थ्यांचे भ्रमणध्वनी व रोख रक्कम असा लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याचा प्रकार क. का. वाघ तंत्रनिकेतन महाविद्यालयात घडला होता. सुमारे दीडशेहून अधिक विद्यार्थ्यांना त्याची झळ सोसावी लागल्याचे सांगितले जाते. चोरीला गेलेल्या साहित्यामध्ये काही विद्यार्थ्यांचे अतिशय महागडे म्हणजे २० ते २५ हजार रुपयांच्या भ्रमणध्वनींचाही समावेश आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांची पाकिटेही बॅगेत ठेवलेली होती, त्यांच्या ५०० ते पाच हजार रुपयांपर्यंतची रक्कमही चोरटय़ाने गायब केली. या प्रकरणी एका विद्यार्थ्यांने ज्यांचा भ्रमणध्वनी व रोख रकम लंपास झाले, त्यांची यादी तयार करून आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या निवेदनाच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी तक्रारदारांचे म्हणणे जाणून घेणे आवश्यक आहे. त्याकरिता पोलिसांनी संबंधितांशी संपर्क साधून विद्यार्थ्यांना पोलीस ठाण्यात येण्याचे आवाहन केले. परंतु, बुधवारी पेपर नसल्याने त्यातील कोणीही विद्यार्थी महाविद्यालयात आले नाहीत. या बाबतची माहिती तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक राजेश गवळी यांनी दिली. द्वितीय वर्षांचा पुढील पेपर गुरुवारी असल्याने आणि त्याचा अभ्यास करण्यात सर्व गर्क असल्याने हा पेपर झाल्यावर विद्यार्थ्यांनी भेटण्याचे मान्य केले. परिणामी, पोलीस यंत्रणेने बुधवारी महाविद्यालयात प्रत्यक्ष जाऊनही विद्यार्थीच भेटू शकले नाहीत. विद्यार्थी अभ्यासात मग्न असल्याने या प्रकरणाचा तपास करण्याची परीक्षा आता पोलीस यंत्रणेला द्यावी लागत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा