धाराशिव – हजारो वर्षांपासून जमिनीच्या पोटात दडलेला वैभवशाली ऐतिहासिक वारसा आता याची देही याची डोळा अनुभवता येणार आहे. तेर येथील कोट टेकडीवर उत्खननाची जिवंत प्रात्यक्षिक प्रयोगशाळा विकसित केली जाणार आहे. त्यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नांतून १३ कोटी ३८ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून त्याची निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली आहे.
इतिहास व पुरातत्व शास्त्राची आवड असणाऱ्या विद्यार्थी, अभ्यासक व पर्यटकांना उत्खनन सुरू असताना थेट पाहता येणार आहे. तेर येथील कोट टेकडीवर पुरातत्त्व खात्याच्या शास्त्र संकेतानुसार उत्खनन, जतन व संवर्धन यासह जिवंत प्रात्यक्षिकाची प्रयोगशाळा विकसित करण्यात येणार आहे. या कामांसह इतर पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी १३ कोटी ३८ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
हेही वाचा – “…तर प्रकाश आंबेडकरांना मुख्यमंत्री करायला हवं”, बच्चू कडूंची विधानसभेत मागणी
जेथे जिवंत उत्खनन पाहण्याची व्यवस्था केली जाणार आहे त्या सदर कोट परिसराभोवतीच्या सुरक्षा भिंतीची दुरुस्ती, टेंसाईल छत, बगीच्या विकसित करणे, पर्यटकांकरिता अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करणे तसेच बौद्ध स्तुपाचे पुरातत्त्व शास्त्र संकेतानुसार संवर्धन आदी कामे प्रस्तावित असल्याची माहिती आमदर राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
तेर येथे अनेक प्राचीन राज्य संरक्षित स्मारके आहेत. त्यांच्या जतन, दुरुस्ती व संवर्धनाकरिता मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून घेतला जात आहे. तेरणा ट्रस्ट आणि अजिंक्यतारा कन्सल्टन्सीच्या माध्यमातून तेरमधील प्राचीन मंदिरे, पुराणवास्तूंचा बृहत आराखडा तयार करण्यात आला होता. निधीच्या उपलब्धतेनुसार टप्प्याटप्प्याने यातील कामे आता प्राधान्यक्रमानुसार हाती घेतली जात आहेत.
हेही वाचा – सोलापुरात लाखाहून जास्त क्विंटल कांद्याची आवक; दर घसरण सुरूच
पर्यटन विभागाच्या उपसंचालक डॉ. माया पाटील यांच्यासह १२ तज्ञांच्या पथकाने सन २०१५ मध्ये या टेकडीवर उत्खननास सुरुवात केली होती. येथे पाण्याचा आड, हौद, घराच्या पायऱ्या, नक्षीदार दागिने असे अवशेष उत्खननात सापडले आहेत. त्यासाठीच कोट टेकडी परिसर एक उत्खनणाची कार्यशाळा म्हणून विकसित करण्यात येत आहे. या ठिकाणी प्रामुख्याने स्तरविज्ञान शास्त्राचा अभ्यास केला जाणार आहे. सुमारे एक एकर क्षेत्रावर टेंसाईल छत टाकला जाणार आहे. संरक्षक भिंत व त्यालागत प्रशस्त उद्यान विकसित करण्यात येणार आहे. पुरातत्व विभागाच्या अभ्यासकांसाठी व पर्यटकांसाठी ही साईट एक पर्वणी ठरणार असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.