लोकसत्ता प्रतिनिधी
सांगली : वाढत्या उत्पादनाच्या हव्यासातून होत असलेल्या रासायनिक खतांच्या बेसुमार वापरामुळे निसर्ग साखळी विस्कळीत होत आहे. जमिनीचा पोत सुधारण्यासाठी जैविक नियंत्रणाच्या उपाय योजना करण्याची गरज आहे असे मत आमदार अरूण लाड यांनी व्यक्त केले.
क्रांती कारखान्याच्या कार्यस्थळावर अनुसूचित जाती वर्गातील अल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बॅटरीवर चालणारे फवारणी पंप व अनुषांगिक साहित्याचे वाटप करण्यात आले. हे प्रशिक्षण भारतीय उस संशोधन संस्था लखनौच्या जैविक नियंत्रण केंद्र प्रवरानगर यांच्यावतीने आयोजित करण्यात आले होते. यावेळी शास्त्रज्ञ डॉ. ज्ञानेश्वर बोरसे, डॉ.योगेश थोरात, कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड, कार्यकारी संचालक आप्पासाहेब कोरे आदी उपस्थित होते.
आणखी वाचा-हे हिंदूंचे राष्ट्र, त्यांचे हित प्रथम – नितेश राणे
यावेळी बोलताना आ. लाड म्हणाले, अधिक उत्पादनाच्या हव्यासापोटी रासायनिक खते व किटकनाशके याचा बेसुमार वापर वाढला आहे. शेतीतील उत्पादन वाढले असले तरी रासायनिक निविष्ठांमुळे निसर्ग साखळी विस्कळीत झाली आहे, नैसर्गिक किड नियंत्रण कमी झाले आहे. शेतीचा पोत सुधारणेसाठी जैविक नियंत्रणाच्या उपाययोजना अमलात आणणे आवश्यक बनले आहे.
यावेळी डॉ. थोरात यांनी ऊसपिकावर येणाऱ्या किडी व त्याच्या नियंत्रणासाठी संशोधन केंद्रामार्फत विकसित केलेले जैविक नियंत्रणाचे उपाय या विषयी उपस्थित शेतक-यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक हर्षल पाटील यांनी केले तर संचालक संग्राम जाधव यांनी आभार मानले.