आगामी अधिवेशनापुर्वी मंत्रीमंडळाचा विस्तार होईल असे सुतोवाच राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांनी शनिवारी विटा येथे माध्यमांशी बोलताना दिले. मंत्रीमंडळ विस्तारात विटेकरांना चांगली बातमीही मिळेल, असे संकेतही त्यांनी यावेळी दिले. विटा येथे आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबीराच्या निमित्ताने मंत्री देसाई आले होते. यावेळी आमदार बाबर यांच्या समवेत शिबीराचे उद्घाटन झाल्यानंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.
हेही वाचा- “कायद्याचा अभ्यास करून सरकार स्थापन केलं”; फडणवीसांचं विधान, सुप्रीम कोर्टाच्या निकालावरही भाष्य
देसाई म्हणाले, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार आणि खासदार गद्दार आहेत अशी टीका वारंवार केली जाते या टीकेला चांगल्या कामातून चोख उत्तर देण्याचे काम सुरू आहे. आमचे कामच याबाबत बोलत आहे. मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीच अधिकृतपणे बोलतील असे सांगून ते म्हणाले, आगामी अधिवेशनापुर्वी मंत्रीमंडळाचा विस्तार होण्याची शययता आहे. आ. बाबर हे केवळ आमच्या गटाचेच लोकप्रतिनिधी आहेत असे नाही तर आमच्या गटाचे ते मार्गदर्शकही आहेत. अधिवेशनापूर्वी विटेकरांना चांगली बातमी ऐकण्यास मिळेल असेही त्यांनी सांगत बाबर यांच्या मंत्रीपदाला अप्रत्यक्ष दुजोरा दिला.
माझा विभाग राज्याची तिजोरी भरण्याचे काम सर्वाधिक करीत असतो. करोनामुळे महसूलात घट झाली असली तरी येत्या महिन्यात ही घट कमी कशी करता येईल याचे नियोजन करण्यात आले आहे. महसूलाचे आमच्या विभागाला देण्यात आलेले लक्ष्य गाठण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत वृत्तवाहिनीवर बोलायला लागले की लोक आपोआप वाहिनी बदलत असतात. खा. राउत यांची व्यर्थ बडबड ऐकण्यास लोक आता राजी नाहीत अशी टीका यावेळी मंत्री देसाई यांनी केली. पत्रकार शशिकांत वारसे प्रकरणाचा तपास सुरू असून या प्रकरणी संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाच्या मुळाशी जाउन हा खून कोणत्या पार्श्वभूमीवर झाला, कोणी यामागे आहे याचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्याबाबत मुख्यमंत्री शिंदे हे निश्चितच सकारात्मक भूमिका घेतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.