महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी मेळाव्यांचे आयोजन करत आपला वेगळा ठसा उमटविणाऱ्या खा. सुप्रिया सुळे या कमालीच्या व्यस्त असणे साहजिकच. या व्यस्ततेचा अनुभव राजकीय मंडळींना येत असतानाच अगदी त्या पदाधिकारी असलेल्या संस्थांच्या कार्यक्रमांसाठीही उपलब्ध होणे त्यांना जमू शकत नसल्याचेही स्पष्ट होत आहे. नवमहाराष्ट्र युवा अभियानच्या वतीने दरवर्षी राष्ट्रीय युवा दिनी आयोजित करण्यात येणारा यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय सामाजिक व क्रीडा युवा पुरस्कार प्रदान सोहळाही त्यामुळे यंदा इतर दिवशी होणार आहे. हा सोहळा आता कोणत्या दिवशी आयोजित होईल, याविषयी युवक व युवतींमध्ये उत्सुकता आहे.
महाराष्ट्राच्या सर्वागीण विकासासाठी युवा आंदोलनाच्या क्षेत्रात विधायक व भरीव कार्य करणाऱ्या एका युवतीस व युवकास ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय सामाजिक युवा पुरस्कार’ तसेच महाराष्ट्रातील उत्कृष्ठ खेळाडू म्हणून कार्याचे मूल्यमापन करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन मिळावे, या हेतूने ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा क्रीडा पुरस्कार’ दरवर्षी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या नवमहाराष्ट्र युवा अभियानतर्फे दिले जातात. रूपये २१ हजार, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. दरवर्षी राष्ट्रीय युवा दिनी पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन केले जाते. परंतु यंदा अद्याप पुरस्कारांचीही घोषणा करण्यात आलेली नाही. त्यातच प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा व अभियानच्या निमंत्रक खा. सुप्रिया सुळे यांच्या व्यस्ततेमुळे पुरस्कार प्रदान सोहळा राष्ट्रीय युवा दिनाव्यतिरिक्त अन्य दिवशी होणार असल्याचे कळते.
राजकारणाबरोबरच सामाजिक कार्यातही खा. सुळे या राष्ट्रवादी काँग्रेसमधील इतर कोणत्याही लोकप्रतिनिधीपेक्षा अधिक सक्रिय असल्याचे मानले जाते. बचत गटांच्या माध्यमातून महिलांना स्वंयरोजगार मिळावा म्हणून सतत प्रयत्नशील असणाऱ्या सुप्रियाताईंकडे महिला व युवतींना आपल्याकडे आकर्षित करण्याचे कसब असल्यामुळेच जणूकाही राष्ट्रवादी युवती काँग्रेसची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली. वेगवेगळ्या ठिकाणी विभागीय मेळाव्यांचे आयोजन करून सुप्रियाताईंनीही हे शिवधनुष्य पेलल्याचे सिध्द करून दाखविले.
यासारख्या इतर अनेक कार्यक्रमांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागल्याने सुप्रियाताईंचा वेळ मिळणे अवघड होऊ लागल्याची प्रतिक्रिया कार्यकर्त्यांकडून व्यक्त होऊ लागली. त्याचा अनुभव आता खुद्द त्या स्वत: निमंत्रक असलेल्या नवमहाराष्ट्र युवा अभियानलाही यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या निमित्ताने येत असल्याची चर्चा आहे.

Story img Loader