माहिती अधिकाराची पायमल्ली करणाऱ्या कळवा येथील घाटघर जलविद्युत प्रकल्प विभाग क्रमांक २ चे कार्यकारी अभियंता पी. डी. मिश्रा यांना कोकण खंडपीठाच्या राज्य माहिती आयुक्तांनी ठोठावलेल्या १० हजार ५०० रुपये दंडाची रक्कम त्यांच्या एप्रिल ते जून २०१३ या तीन महिन्याच्या वेतनातून कपात करण्याचे आदेश दिले आहेत.
शहापुरातील सामाजिक कार्यकत्रे विश्वास गोरे यांनी गेल्या वर्षी १७ ऑक्टोबरला जन माहिती अधिकारी तथा कळवा येथील घाटघर जलविद्युत प्रकल्प विभाग क्रमांक २ चे कार्यकारी अभियंता पी. डी. मिश्रा यांच्याकडे कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या घरभाडे भत्त्याबाबतची माहिती मागविली होती. मात्र मिश्रा यांनी माहितीचा अधिकार पायदळी तुडवत गोरे यांना माहिती देण्यास टाळाटाळ केली. याबाबत गोरे यांनी पहिले अपील २६ नोव्हेंबरला केल्यानंतरसद्धा त्यांना माहिती देण्यात आली नव्हती. विश्वास गोरे यांनी दुसऱ्या अपिलात राज्य माहिती आयुक्तांकडे दाद मागितली असता या वर्षी २१ जानेवारीला सुनावणी घेण्यात आली. त्यामध्ये मिश्रा यांनी अर्जदार गोरे यांना २८ डिसेंबरला माहिती दिली असल्याचे सुनावणीदरम्यान सांगितले. मात्र जन माहिती अधिकारी पी. डी. मिश्रा यांनी विश्वास गोरे यांना माहिती देण्यास विलंब केल्याचा ठपका ठेवत कोकण खंडपीठाचे राज्य
माहिती आयुक्त एम.एच.शहा यांनी मिश्रा यांना १० हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावला असून एप्रिल ते जून या तीन महिन्यातील वेतनामधून दंडाची रक्कम वसूल करण्याचे आदेश संबंधित विभागाला देण्यात आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा