आजवर समाजाची सर्वागीण प्रगती की अधोगती झालीय हे पडताळण्यासाठी राज्याच्या व देशाच्या एकंदरच अर्थव्यवस्थेचा अभ्यास करावा लागेल असे सांगताना, देशातील एकाही शास्त्रज्ञ, अभियंता वा विद्वानाला नोबेल पारितोषिक का मिळत नाही, केंद्र शासनामध्ये महाराष्ट्रातील एकही सचिव नाही. कोणी सैन्यदलाच्या सर्वोच्च पदावर पोहोचले नसल्याबद्दल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी चिंता व्यक्त केली. भारताला महासत्ता व्हायचे असेल तर इथल्या विद्यार्थ्यांचे मायबोलीबरोबरच इंग्रजी व गणितावर प्रभुत्व असणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
कराड आर्किटेक्ट अँड इंजिनिअर्स असोसिएशनतर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘सर विश्वेश्वरैया पुरस्कार’ जुन्या पिढीतील तज्ज्ञ स्थापत्य अभियंता पांडुरंग कृष्णाजी नलवडे यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी वनमंत्री डॉ. पतंगराव कदम हे होते. तर गृहराज्यमंत्री सतेज पाटील, नगराध्यक्ष प्रा. उमा हिंगमिरे, आनंदराव पाटील यांची उपस्थिती होती. सत्कार समारंभापूर्वी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडी) ‘मुंबई मेट्रो लाईन थ्री’ या २५ हजार कोटी खर्चाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची चित्रफीत देशात प्रथमच दाखवण्यात आली.
सत्कारमूर्ती पांडुरंग कृष्णाजी नलवडे तथा काका हे आपले प्रदीर्घ आयुष्य तळमळीचे उत्कृष्ट अभियंता म्हणून जगले. वयाच्या ८०व्या वर्षीही ते अभियंत्यांसाठी सक्रिय व मार्गदर्शक असल्याबद्दल समाधान व्यक्त करून चव्हाण म्हणाले, की लोकांचे महानगराकडे आकर्षण असल्याने वाढते नागरीकरण व द्यावयाच्या पायाभूत सेवासुविधा हे मोठे आव्हान आहे. वाढत्या नागरीकरणातच मुंबई विकसनशील व झोपडपट्टीमुक्त करायची आहे. मात्र, कोण खासगी विकसक स्वीकारायचा, विकसकांची भांडणे, बांधकामातील गैरप्रकारांमुळे मुंबईची पुरती वाट लागत असताना, आघाडीच्या सरकारमुळे खंबीरपणे निर्णय घेता येत नसल्याची खंत त्यांनी व्यकत केली. तरीही मोठय़ा धाडसाने निर्णय घेत आहोत. मात्र, झोपडपट्टीमुक्त मुंबई आणि सर्वच समाजघटकांना निवारा देण्यासाठी बांधकामांना काय सवलती द्यायच्या असा प्रश्न सतावतो आहे. १६० चौरस फुटांच्या खुराडय़ासारखी राहण्याची गृहयोजना मला मान्य नाही. वाहतुकीचा प्रश्न पाहता जे लोक ज्या ठिकाणी काम करतात, तेथेच त्यांच्यासाठी घरे व्हावीत, सर्वच शहरांचा उत्तम विकास आराखडा व्हावा अशी भूमिका असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा