भाजपचे उमेदवार गोपीनाथ मुंडे यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीचे सुरेश धस यांच्यासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व अजित पवार यांनी राजकीय ताकद लावल्याने पवारांची प्रतिष्ठा व मुंडेंचे राजकीय अस्तित्व पणाला लागले आहे. पुन्हा एकदा मुंडे विरुद्ध पवार असाच सामना येथे रंगला. मतदानाच्या पूर्वसंध्येला परळी, माजलगाव, केज व आष्टी या ४ विधानसभा मतदारसंघांत भाजपची बाजू भक्कम असल्याचे मानले जात असून, गेवराई व बीड या दोन मतदारसंघांतील मताधिक्यावर राष्ट्रवादीची मदार आहे.
जिल्हय़ातील पक्षाचे ८ आमदार, मंत्री व प्रदेश पातळीवरील नेत्यांनी मुंडेंना घेरण्याचा जोरदार प्रयत्न केला. पवार यांनी दोन मुक्काम, जिल्हाभर दौरा व ४ सभा, तर अजित पवार यांनीही अनेक सभा घेऊन वातावरण तापविले. राष्ट्रवादीकडे असलेल्या विधानसभेच्या ५ मतदारसंघांतून पक्षाच्या उमेदवाराला मताधिक्य मिळालेच पाहिजे, अन्यथा आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दिली जाणार नाही, असा सज्जड दम भरल्यामुळे पक्षाचे सर्व आमदार पदरमोड करून प्रचारात उतरले. गोपीनाथ मुंडे यांनीही आपले राजकीय कौशल्य पणाला लावून राष्ट्रवादीचे डावपेच उधळून लावण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादीचे चार माजी आमदार, अनेक पदाधिकारी आपल्या बाजूने घेऊन पवारांना तोडीस तोड उत्तर दिले. आमदार पंकजा पालवे यांनी जिल्हाभरात साडेपाचशेपेक्षा जास्त गावांत जाऊन प्रचाराची राळ उडवली. राष्ट्रवादीकडून पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर, आमदार अमरसिंह पंडित, धनंजय मुंडे यांनी मुंडेंवर आरोपांच्या फैरी झाडत बाजू सांभाळली.
उमेदवार सुरेश धस यांनी जि. प.च्या ५९ गटांत सभा घेतल्याने सुरुवातीला एकतर्फी वाटणाऱ्या लढतीचे चित्र बदलले. धस यांच्या विनोदी ढंगाच्या भाषणांची चर्चा गावागावांत गेली. निवडणुकीच्या पूर्वसंध्येला पडद्याआड दोन्ही पक्षांकडून अनेक डावपेच टाकले गेले. आपचे नंदू माधव यांना अंबाजोगाई, केज, बीड परिसरात चांगले समर्थन मिळण्याची शक्यता आहे. इतर ३७ उमेदवार मात्र फारशी मते घेतील, अशी शक्यता वाटत नाही.
बीडला मुंडेंचे अस्तित्व, पवारांची प्रतिष्ठा पणाला!
भाजपचे उमेदवार गोपीनाथ मुंडे यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीचे सुरेश धस यांच्यासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व अजित पवार यांनी राजकीय ताकद लावल्याने पवारांची प्रतिष्ठा व मुंडेंचे राजकीय अस्तित्व पणाला लागले आहे.
आणखी वाचा
First published on: 17-04-2014 at 01:50 IST
TOPICSगोपीनाथ मुंडेGopinath Mundeनिवडणूक २०२४ElectionबीडBeedशरद पवारSharad Pawarसन्मानHonour
+ 1 More
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Existence of gopinath munde honour of sharad pawar in beed