दीड हजार रुग्णांवर उपचारासाठी यंत्रणा उभारण्याच्या दृष्टीने नियोजन
नीरज राऊत, लोकसत्ता
पालघर : पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात करोनाबाधित रुग्णांची संख्या २०च्या जवळपास असली तरीदेखील राज्यातील वाढलेली रुग्णांची संख्या पाहता जिल्ह्याने नव्याने समर्पित करोना रुग्णालय उभारण्याच्या दृष्टीने ठोस पावले उचलली आहेत. जिल्ह्यात या आठवडाअखेरीस करोनाबाधित २३० गंभीर रुग्णांना तर लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणे असणाऱ्या एक हजार करोनाबाधितांना उपचार करण्याची सुविधा कार्यरत करण्याचा प्रयत्न आहे. तसेच परिस्थितीनुसार आवश्यकता भासल्यास जिल्ह्यात या दोन्ही प्रकारच्या १५०० रुग्णांवर उपचार करण्याची सुविधा करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. त्याचपद्धतीने संसर्गाच्या तपासणीसाठी डहाणू येथे प्रयोगशाळेला मान्यता मिळण्यासाठी आयसीएमआरकडे अर्ज करण्यात आला आहे.
राज्यामध्ये करोनाबाधित रुग्णांपैकी सुमारे ८० टक्के रुग्णाला या आजाराची लक्षणे दिसून येत नसल्याचे आढळले असून त्यांना समर्पित कोविड आरोग्य केंद्र (डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर- डीसीएचसी) मध्ये उपचार केले जातात. अशा सौम्य प्रकारे बाधित झालेल्या रुग्णांच्या उपचारासाठी पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात तसेच डहाणू येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये प्रत्येकी २० खाटांची सध्या व्यवस्था आहे.
यामध्ये येत्या आठवडय़ात वाडा येथील आयडियल हॉस्पिटलमध्ये १०० खाटांची अतिरिक्त व्यवस्था करण्यात येणार असून आगामी काळात तलासरी येथील दयानंद रुग्णालय व गरज भासल्यास
डहाणू तालुक्यातील वेदांत रुग्णालय २५० खाटांची व्यवस्था करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यात इतर ठिकाणी अशाच पद्धतीने व्यवस्था करण्याचे काम हाती घेण्यात आले असून ८००-१००० रुग्णांची व्यस्था करण्यासाठी आरोग्य विभागाची तयारी सुरू आहे.
बोईसरमध्ये पहिला रुग्ण
पालघर/बोईसर : बोईसर- तारापूर परिसरात करोनाचा पहिला रुग्ण आढळला असून बोईसर शहराचा अधिकतर भाग पोलिसांनी बंद के ला आहे. पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील करोना रुग्णाची संख्या २१ वर पोचली आहे.
जिल्ह्यात आजवर १३९ नागरिकांना करोनाची बाधा झाली असून त्यापैकी १० जणांचा मृत्यू झाला आहे. वसई— विरार महानगरपालिका क्षेत्रातील रुग्णाची संख्या ११८ असून वसई ग्रामीण भागात एक रुग्ण आढळला. करोनाचे डहाणू तालुक्यात आठ रुग्ण असून पालघर तालुक्यातील रुग्णाची संख्या १२ वर पोहोचली आहे.
भीमनगर जावळी हरिद्वार गार्डन सोसायटी (दलाल संकुल) मधील एका ३५ वर्षीय रुग्णाला करोना संसर्ग झाल्याचे चाचणीत निष्पन्न झाले असून त्याला पालघर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. या रुग्णाच्या जवळच्या संपर्कात असलेल्या दहा व्यक्तींना विलगीकरण करण्यात आले असून त्यांच्या घराचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत.
शहरात वाहतुकीवर कडक निर्बंध लावले आहेत. औद्योगिक परिसरात अनेक कारखाने अत्यावश्यक सेवेतील उत्पादन असल्याने तसेच काही उद्योग सलग उत्पादन प्रक्रियेसाठी कार्यरत आहेत.