रेल्वे मंत्रालय क्रांतिकारी निर्णय घेणार आहे. रेल्वेचे मार्ग निर्माण करून देशातील पूर्वेकडील राज्ये रेल्वेने जोडल्यास विकासाची कल्पना पूर्ण करता येईल. त्यासाठी चीनच्या सीमेपर्यंत रेल्वे नेण्याचा विचार रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केला. कोकण रेल्वे इंडियन रेल्वेत विलीन करण्याची गरज नाही. तसेच कोकण रेल्वेसाठी आंतरराष्ट्रीय संस्थांकडून निधी उभारला जाऊ शकतो, असेही प्रभू म्हणाले. केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. त्यांचा मालवण व कुडाळमध्ये नागरी सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
रेल्वेचे जाळे पूर्वेकडील भागात उभारण्याचा मानस आहे. त्यासाठी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्याशी चर्चा झाली असून, चीनच्या सीमेपर्यंत रेल्वे नेण्यासाठी दोन लाख कोटींची गरज आहे. या भागात रेल्वे गेल्यास प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष नोकऱ्या, रोजगार निर्माण होऊन नक्षलवादाचा नायनाट करता येईल, असा विश्वास सुरेश प्रभू यांनी व्यक्त केला.
रेल्वे मंत्रालय हे स्वतंत्र अर्थसंकल्प सादर करते. भारतीय रेल्वेचा विस्तार केल्यास देशाची आर्थिक क्षमता वाढेल. रेल्वेमुळे देशात रोजगार, नोकऱ्या निर्माण होऊ शकतात. देशाचे आर्थिक रूप बदलण्याची ताकद रेल्वेत असल्याने पुढील काळात क्रांतिकारक निर्णय घेतले जातील. रेल्वे बजेटमध्ये सर्वसामान्य लोकांना अभिप्रेत धरले जाणार आहे, असे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू म्हणाले. जागतिक तसेच भारतीय अर्थव्यवस्थेत वाढ झाली, तरी नोकऱ्या किंवा रोजगार नाहीत ही विषमता दूर करण्यासाठी भारतात उत्पादन करणारे प्रकल्प आले पाहिजेत, पर्यटन हा मोठा उद्योग आहे, त्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण व्हायला पाहिजेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी विकासासाठी कटिबद्ध असून रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातून देशाच्या विकासासाठी येत्या अर्थसंकल्पात नवनवीन उपक्रम हाती घेण्याचा संकल्प सोडला जाईल, असे सुरेश प्रभू म्हणाले. रेल्वेची नवीन लाइन, दुपदरी, तीन पदरी अशा रेल्वेच्या लाइनमध्ये परिस्थितीनुसार वाढ करतानाच जम्मू, ओरिसा, झारखंडसारख्या पूर्वेकडील भागात भारतीय रेल्वेचे जाळे उभारून नोकऱ्या, रोजगार निर्माण झाल्यास नक्षलवाद संपविता येईल. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीही चर्चा झाल्याचे प्रभू म्हणाले.
महिला बचत गटांचे जाळे विणले आहे. या बचत गटांच्या उत्पादित मालास कोकण रेल्वे स्थानकावर विक्रीचा प्रयोग यशस्वी झाल्यास भारतीय रेल्वे स्थानकांवर उत्पादनास संधी दिली जाईल, तसेच रेल्वेच्या जमिनीत स्वच्छता पाळत लागवड करून नवनिर्माण रोजगार करता येतील का? हेही तपासले जात आहे, पण पुढील काळात रेल्वेच्या माध्यमातून विकास साधण्याचे विविध उपक्रम हाती घेण्यात येतील असे प्रभू म्हणाले. रेल्वे मंत्रालयापासून भ्रष्टाचाराची साफसफाई करण्यास सुरुवात केल्याचे सुरेश प्रभू यांनी जाहीर करून, कोकण रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण हाती घेतानाच रेल्वे रूळ बदलण्यासाठी सेप्टी ऑडिटचे आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले.
कुडाळ येथील नागरी सत्कार प्रसंगी शास्त्रज्ञ, पद्मभूषण रघुनाथ माशेलकर व खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी सुरेश प्रभू यांच्या बाबत गौरवोद्गार काढले. त्यांनी प्रभू यांना आतापर्यंत मिळलेल्या संधीचा त्यांनी देशाच्या हितासाठी फायदा करून दिल्याचे म्हटले. कुडाळ येथील नागरी सत्कार प्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, राज्यमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, आ. विजय सावंत, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, राजन तेली, आमदार विनायक मेटे, माजी आमदार शिवराम दळवी तसेच मान्यवर उपस्थित होते.