महाविकास आघाडीची आज नरीमन पॉइंट येथील ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठक बोलावण्यात आली होती. ही बैठक नुकतीच संपली असून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, कोणत्या पक्षांना महाविकास आघाडीत सामिल करून घेतलं याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बैठक संपल्यानंतर संजय राऊत म्हणाले, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना (ठाकरे गट) या महाविकास आघाडीच्या प्रमुख पक्षांची महत्त्वाची बैठक सकाळी सुरू झाली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, वर्षा गायकवाड, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, नेते जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख, मी आणि विनायक राऊत या बैठकीला उपस्थित होतो. आजच्या बैठकीत आमची प्रदीर्घ चर्चा झाली. आज बरेच निर्णय झाले. मुख्यत्त्वे आज महाविकास आघाडीचा विस्तार झालेला आहे.

हेही वाचा >> मोठी बातमी! ‘वंचित’च्या प्रयत्नांना यश, महाविकास आघाडीत समावेश; काँग्रेस-ठाकरे गट-राष्ट्रवादीचे एकमत!

“आज महाविकास आघाडीमध्ये सीपीआयएम, सीपीआय, शेतकरी कामगार पक्ष, जनता दल युनायडेट, वंचित बहुजन आघाडी, समाजवादी पार्टी, शेकाप या सगळ्यांचा समावेश महाविकास आघाडीत झाला आहे. या सगळ्या प्रमुख नेत्यांशी व्यवस्थित सकारात्मक चर्चा झाली. महाविकास आघाडी अधिक मजबुतीने पुढे जातेय. नवीन मित्र आम्हाला मिळाले आहेत”, असंही संजय राऊत म्हणाले.

वंचितचा अपमान?

दरम्यान, महाविकास आघाडीच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांचा अपमान झाला असा आरोप वंचितचे प्रवक्ते धैर्यवर्धन पुंडकर यांनी केला होता. त्यांना बैठकीच्या बाहेर तास-दीडतास थांबवून ठेवलं होतं, असं ते म्हणाले. त्यावर संजय राऊत म्हणाले, मला असं वाटतं हा गैरसमज पोहोचलेला आहे. वंचित आघाडीचे तीन प्रमुख नेते प्रकाश आंबेडकर यांनी पाठवले होते. ते आजच्या बैठकीत सकाळपासून आमच्याबरोबर चर्चेला बसले होते. आम्ही एकत्र जेवण केलं आहे आणि चांगल्या प्रकारे चर्चा झाली. त्यांना जे पत्र हवं होतं तेही आज त्यांना दिलं आहे.. २ तारखेच्या बैठकीला प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार आहेत, असंही ते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Expansion of the mahavikas aghadi to include these parties with vanchit after the meeting raut said sgk