लोकसत्ता वार्ताहर
कराड : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कराड शाखेस २ जानेवारी १९४० रोजी भेटीसह व्यक्त केलेल्या सद्भावनेच्या ऐतिहासिक घटनेचे स्मरण म्हणून त्या ठिकाणीच लोककल्याण मंडळ न्यासातर्फे आज बंधुता परिषद आणि आपुलकी मेळाव्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित दलित नेत्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाप्रती सद्भावना व्यक्त करताना, या परिषदेतून सर्वांना एकत्र घेऊन जाण्याचा विचार रुजावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
या परिषदेच्या अध्यक्षस्थानी विवेक विचार मंचचे अध्यक्ष माजी खासदार प्रदीप रावत होते. तर, देहूरोड धम्मभूमी न्यासाचे विश्वस्त ॲड. क्षितिज गायकवाड, दलित महासंघाध्यक्ष प्रा. मच्छिंद्र सकटे, बौद्ध युवक संघटनेचे विजय गव्हाळे, विनोद अल्हाटे, भरत अमदापुरे, आमदार डॉ. अतुल भोसले, विक्रम पावसकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
प्रदीप रावत यांनी समाजात बंधुता रुजवण्यासाठी एकदिलाने काम करू या, असे आवाहन केले. ॲड. क्षितिज गायकवाड म्हणाले, की डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात बंधुत्वाचा उल्लेख केला असून, संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाच्या माध्यमातून बंधुत्वाची भावना रुजविण्याचे काम केले. सर्वांना एकत्र घेऊन जाण्याचा विचार बंधुता परिषदेतून व्हावा. समाजात वाढीस लागलेली वैचारिक अस्पृश्यता संपली पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी या वेळी व्यक्त केली.
विजय गव्हाळे म्हणाले, की बाबासाहेबांच्या मते संघामध्ये सलगी नसली, तरी दुरावाही नव्हता. मैत्री नसली, तरी वैरभाव नव्हते. आज बाबासाहेबांना अपेक्षित असलेल्या बंधुत्वाची देशाला खूप गरज आहे. हिंदू आणि बौद्ध एकत्र आल्यास त्यांचा आवाज जगभरात पोहोचेल.
प्रास्ताविकात भरत अमदापुरे यांनी बाबासाहेबांच्या परिवर्तनवादी आणि सुधारणावादी चळवळीवर प्रकाशझोत टाकला. बाबासाहेबांचा संघाबाबत असलेला आपलेपणा आणि बंधुता हा धागा धरून या बंधुता परिषदेचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. प्रा. मच्छिंद्र सकटे यांनी ब्राह्मण-दलित एक होऊ शकतात, हे या परिषदेच्या माध्यमातून दाखवून दिले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
आणखी वाचा- अमृत महोत्सवी वर्षात,आनंदवनला आर्थिक मदतीची गरज
केदार गाडगीळ म्हणाले, की कराड नगरपालिकेने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना एका सन्मानासाठी निमंत्रित केले. यानंतर त्यांनी या भवानी मैदानावरील संघशाखेला भेट दिली. त्या वेळी डॉ. आंबेडकर यांनी ‘काही बाबतीत मतभेद असले, तरी मी संघाकडे आपलेपणाने पाहतो,’ असे उद्गार काढल्याचे गाडगीळ म्हणाले. त्या काळी वृत्तपत्रांनीही याची दखल घेत वृत्त प्रसिद्ध केल्याचे गाडगीळ यांनी सांगितले.