अहिल्यानगरः आदर्शगाव हिवरे बाजार व महात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहुरी) यांच्या संयुक्त विद्यमाने हवामान बदलाचा परिणाम, माती व सेंद्रिय कर्बाचा होणारा ऱ्हास याच्या अभ्यासासाठी उभारलेल्या प्रयोगशाळेतून प्रत्येक महसूल विभागातील एका गावाचा प्रायोगिक तत्त्वावर अभ्यास केला जाणार असल्याची माहिती जलसंधारण विभागाचे सचिव गणेश पाटील यांनी आदर्शगाव हिवरे बाजार (ता. अहिल्यानगर) येथे बोलताना दिली.

या प्रयोगशाळेला राज्य सरकारच्या आदर्शगाव योजनेतून निधी उपलब्ध करण्यात आला आहे. सध्या विद्यापीठामार्फत हिवरे बाजारमधील सेंद्रिय कर्बचा अभ्यास केला जात आहे. देशातील ही पहिलीच प्रयोगशाळा असल्याचे राज्य सरकारच्या आदर्शगाव योजनेचे कार्याध्यक्ष डॉ. पोपटराव पवार यांनी सांगितले. यामार्फत राज्यातील पाणलोट क्षेत्र विकासाची कामे झालेल्या गावांमध्येही जमिनीतील सेंद्रिय कर्बचा अभ्यास केला जाणार असल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले.

याबरोबरच आदर्शगाव हिवरे बाजार येथे उभे राहत असलेल्या यशवंतराव चव्हाण एकात्मिक ग्रामीण विकास प्रशिक्षण केंद्राचीही पाहणी जलसंधारण सचिव पाटील यांनी केली. यावेळी पाटील यांनी हिवरे बाजारमधील पाणलोट विकासाचे काम देशात अव्वल असल्याचे कौतुक करून ते म्हणाले की, या प्रशिक्षण केंद्रातून राज्य व देशातील सरपंच व कार्यकर्त्यांना गावाचा कायाकल्प कसा करायचा याचे प्रात्यक्षिक व प्रशिक्षण मिळणार आहे.

या प्रशिक्षण केंद्रातून शाश्वत विकासाच्या नव्या प्रेरणा मिळतील. त्यामुळे देशातील ग्रामविकासाला नवी दिशा व चालना मिळेल. हवामान बदलाच्या अभ्यासासाठी डॉ. पोपटराव पवार यांच्या अनुभवाचा उपयोग होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी डॉ. पवार यांनी गणेश पाटील यांचे स्वागत करताना प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी राज्य व केंद्र सरकारच्या आर्थिक सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. जिल्हा जलसंधारण अधिकारी पांडुरंग गायसमुद्रे, आदर्शगाव योजनेचे कृषी उपसंचालक वसंत बिनवडे, तालुका कृषी अधिकारी सुदर्शन वायसे, कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ सचिन नांदगुडे, नाम फाउंडेशनचे संग्राम खलाटे आदी उपस्थित होते.

माहिती संकलन सन १९९५ पासून पाणलोट विकासाचे काम सुरू केल्यानंतर हिवरे बाजारमधील सेंद्रिय कर्बाच्या अभ्यासाचा डाटा संकलित करण्यात आला आहे. त्याचा उपयोग जागतिक हवामान बदलाच्या अभ्यासासाठी होत आहे. मातीच्या आरोग्यासाठी हवेतील कार्बन व पावसाच्या पाण्याबरोबर वाहून जाणारा कार्बन याचे मोजमाप केले जात आहे, असेही डॉ. पोपटराव पवार यांनी सांगितले.