जैतापूर प्रकल्प आणि दिल्ली-मुंबई कॉरिडॉरविषयी केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले आहे. कालपर्यंत सेझ, दिल्ली-मुंबई कॉरिडॉरसारख्या प्रकल्पांना विरोध करणारे गीते आता पंतप्रधानांना हा प्रकल्प आमच्या जिल्ह्य़ात नको असे ठणकावून सांगणार का, असा सवालही तटकरे यांनी केला आहे. ते अलिबाग येथे राष्ट्रवादीच्या निर्धार मेळाव्यात बोलत होते.       यूपीए सरकारच्या काळात जिल्ह्य़ात येऊ घातलेल्या महामुंबई सेझ, जैतापूर आण्विक प्रकल्पांना विरोध करणारी शिवसेना, आज कोकणात दोन मोठे प्रकल्प आणण्याच्या गोष्टी करते आहे. निवडणुकीपूर्वी एक आणि निवडणुकीनंतर एक अशी दुटप्पी भूमिका शिवसेनेने घेतली आहे. रायगड जिल्ह्य़ात येऊ घातलेला दिल्ली-मुंबई कॉरिडॉर हा केंद्र सरकारचा प्रकल्प आहे. या प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध आहे. देशाचे अवजड उद्योगमंत्री आणि रायगडचे खासदार म्हणून अनंत गीते यांची या प्रकल्पाबाबत नेमकी काय भूमिका आहे. हे त्यांनी स्पष्ट करावे, असे आव्हान सुनील तटकरे यांनी दिले.
      स्थानिकांचा विरोध असल्याने दिल्ली-मुंबई कॉरिडॉर हा प्रकल्प आमच्या जिल्ह्य़ात नको, असे पंतप्रधानांना ठणकावून सांगण्याचे धारिष्टय़ गीते दाखवणार का, असा सवाल त्यांनी केला. दिल्ली-मुंबई कॉरिडॉरसाठी सक्तीचे भूसंपादन करू नये, अशी भूमिका आपण सुरुवातीपासून घेतली होती. राज्याच्या मंत्रिमंडळात असतानाही आणि त्यानंतरही मी माझ्या भूमिकेवर ठाम होतो. त्यामुळे राज्य सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये सक्तीचे भूसंपादन केले जाणार नाही, असे स्पष्ट नमूद केले असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले. जिल्ह्य़ात महामुंबई सेझला विरोध करणारा मी पहिला मंत्री होतो आणि माझी भूमिका मी मुख्यमंत्र्यांसमोर ठामपणे मांडली होती. याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली.       लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेमुळे माझा थोडक्यात पराभव झाला. हे समोरच्या उमेदवाराचे कर्तृत्व नक्कीच नव्हते असा टोलाही त्यांनी गीते यांना लगावला. लोकसभेत जरी आमचा पराभव झाला असला, तरी विधानसभा निवडणुकीनंतरचे चित्र नक्कीच वेगळे असेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. राज्यात १४४ जागांसाठी राष्ट्रवादी जरी आग्रही असली, तरी जागा वाटपाबाबतचा निर्णय राष्ट्रीय स्तरावरच होईल. राष्ट्रवादीचे प्रमुख म्हणून शरद पवार, तर काँग्रेसच्या अध्यक्षा म्हणून सोनिया गांधी याच याबाबत निर्णय घेतील. त्यानंतर मतदारसंघ आणि जागेच्या अदलाबदलाबाबतचे निर्णय चच्रेतून घेतले जातील. ज्या ठिकाणी ज्या पक्षाची ताकद असेल त्या पक्षाला उमेदवारी मिळावी, अशी प्रामाणिक भूमिका आपली असणार असल्याचे तटकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.

Story img Loader