केवळ ग्राहकांचा विचार करून केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी लादली. जागतिक व्यापार संघटनेच्या निकषामुळे देशात आयात होणाऱ्या मालावर र्निबध टाकता येत नाहीत. या स्थितीत केंद्राने देशातून निर्यात होणाऱ्या कृषी मालावर र्निबध आणले आहेत, असे टीकास्त्र सोडत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शेतकऱ्यांना किफायतशीर भाव मिळण्यासाठी कोणत्याही कृषी मालाच्या निर्यातीवर र्निबध आणू नयेत यासाठी राज्य शासनाकडून पाठपुरावा होत असल्याचे सांगितले. कृषी आणि फलोत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्ती, संस्था यांना राज्य शासनाच्यावतीने गुरूवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. त्यात वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्काराने ‘लोकसत्ता’चे श्रीरामपूर येथील प्रतिनिधी अशोक तुपे यांनाही सन्मानित करण्यात आले.
येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमास पालकमंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे, फलोत्पादन मंत्री जितेंद्र आव्हाड, जलसंधारण मंत्री नितीन राऊत, कृषी राज्यमंत्री संजय सावकारे उपस्थित होते. राज्यातील १८ टक्के शेती सिंचनाखाली असून, उर्वरित ८२ टक्के क्षेत्र कोरडवाहू आहे. कोरडवाहू शेती पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे. राज्यातील अधिकाधिक क्षेत्र ओलीताखाली आणण्यासाठी केंद्राने राज्याला अधिक निधी देणे आवश्यक असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. नैसर्गिक आपत्तीवेळी आजवर राज्य शासनाने जवळपास १२ हजार कोटींची मदत दिली आहे. देशातील कोणत्याही राज्याने इतक्या तातडीने मदत दिलेली नाही असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
या वेळी कृषी क्षेत्रात नवनवीन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांना २०१३ वर्षांसाठी विविध स्वरुपाचे ८० पुरस्कार देण्यात आले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्काराने लोणी येथील प्रवरा इन्स्टिटय़ूट ऑफ रिसर्च अ‍ॅण्ड एज्युकेशन इन नॅचरल अ‍ॅण्ड सोशल सायन्सेस संस्था तसेच पुणे जिल्ह्य़ातील अनिल मेहेर यांना सन्मानित करण्यात आले. प्रत्येकी ७५ हजार रुपये, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. वसंतराव नाईक कृषीभूषण १६, जिजामाता कृषीभूषण सहा, वसंतराव नाईक शेतीमित्र सात, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी २६, कृषीभूषण (सेंद्रीय शेती) नऊ, उद्यान पंडित ११, पीक स्पर्धा विजेत्या तीन पुरस्कारार्थीना सन्मानित करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा