आषाढी एकादशीचा सोहळा १९ जुलै रोजी होत असून या एकादशीच्या सोहळ्याच्या निमित्ताने पंढरीनगरीत शनिवार (दि. १३) पासून वारकरी, भाविक यांच्या सुरक्षेसाठी दोन पाळ्यात २४ तास बंदोबस्त राहणार असून त्या करिता ९ पोलीस उपअधीक्षक ३७ पोलीस निरीक्षक यांच्यासह सुमारे चार हजार कर्मचारी तैनात आहेत असे विभागीय पोलीस अधिकारी प्रशांत कदम यांनी सांगितले.
यात्रा बंदोबस्त यांच्या निमित्ताने पोलीस उप-अधीक्षक कदम, शहर पोलीस निरीक्षक बाबासाहेब रेड्डी गिड्डे व त्यांचे सहकारी अधिकारी यांनी पाहणी केली. यात्रा काळात जड वाहनांना पूर्णपणे प्रवेश बंद असून वाहतूक नियंत्रणासाठी दोन पोलीस उपअधीक्षक, अठरा पोलीस निरीक्षक, ६८ एपीआय, पी.एस.आय. व ६३८ पोलीस कर्मचारी तैनात आहेत.
यात्रा काळात वारकऱ्यांना त्रास होऊ नये या करता हॉकर्स विरोधी पथक, जलद कृती दल, घातपात विरोधी पथक, कमांडो पेट्रोलिंग, साध्या वेशात चंद्रभागा वाळवंटात पोलीस पथक आदी कार्यरत राहणार आहेत असे कदम व रेड्डी यांनी सांगितले.
आषाढी यात्रेत वारकऱ्यांच्या सोयीकरिता अन् वाहतूक सुरळीत व्हावी या करिता नवीन बस स्थानकातून तीन दिवस एस.टी. बसेस सुटणार नाहीत. यात्रा काळात तीन रस्ता विसावा येथे तात्पुरते भीमा बस स्थानक, तर कोल्हापूरकडून येणाऱ्या एस.टी. बसेस सांगोला रोड बिडारी बंगला येथे तसेच सातारा, वेळापूरकडून येणाऱ्या बसेस मार्केट यार्डजवळी चंद्रभागा स्थानक येथे थांबणार आहेत.
खासगी वाहनातून येणाऱ्या वाहनधारकांच्या वाहनांना थांबण्यासाठी शहराच्या बाहेर पार्किंगची सोय करण्यात आली आहे. येणाऱ्या लाखो वारकऱ्याच्या सुरक्षतेसाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे.
गेले दोन दिवस झाले ऐन वेळी बाका प्रसंग उद्भवला तर कसे तोंड द्यायचे याची प्रात्यक्षिके मंदिर परिसरात घेण्यात आली. कर्तव्यास असलेले कर्मचारी तत्पर आहेत का, याची ही परीक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली. मागील आषाढीप्रमाणे ही आषाढी यात्रा सुरळीत पार पडेल असा विश्वास प्रशांत कदम यांनी व्यक्त केला.
चोवीस तास दर्शन सुविधा
आषाढी एकादशीचे सोहळ्याच्या निमित्ताने पंढरीत वारकरी, भाविक यांची वर्दळ वाढू लागली असून येणाऱ्या वारकऱ्यास विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन व्हावे या करता मंदिर समितीने कालपासून (बुधवार) २४ तास दर्शनाची सोय केली आहे. आळंदी-देहू येथून निघालेल्या सर्व संतांच्या पालख्या पंढरपुरापासून काही कि.मी. अंतरावर आल्याने वारक ऱ्यांना विठ्ठल दर्शनाचा ओढा लागला असल्याने पालखी मुक्कामी विसावताच अनेक वारकरी, हे विठ्ठल दर्शनास येतात. त्यांना त्वरित दर्शन घडावे या करिता २४ तास विठ्ठल- रुक्मिणी दर्शन सोय केली असून ही सोय सुमारे १५ दिवस राहणार आहे, असे कार्यकारी अधिकारी बेलदार यांनी सांगितले. वारीत ही ऑनलाइन दर्शन सोय केल्याने या दर्शनासाठी २० हजार भाविकांनी विठ्ठल दर्शनासाठी ऑनलाइन बुकिंग केले आहे. कालपासून २४ तास दर्शन सोय केल्याने विठ्ठलाच्या पाद्यपूजा, तुळसी अर्चन आदी बंद असून हे सर्व प्रक्षाळ पूजेनंतर चालू होणार आहे. येणाऱ्या भक्त वारकरी यांचे सोयीकरिता विठ्ठल मंदिर समिती सज्ज झाली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा