भारतीय शास्त्रीय संगीतात असलेली गुरू-शिष्य परंपरा असाधारण असून अशी परंपरा अन्यत्र नाही. त्यामुळे ही परंपरा महत्त्वाची वाटते. त्याचबरोबर भारतीय संगीत हे बद्ध नसल्याने त्याचे मोल अधिक आहे, असे मत सेलो वादनातील अग्रगण्य कलाकार श्रीमती नॅन्सी यांनी व्यक्त केले.
संजीवनी मित्रमंडळाच्या वतीने आयोजित ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यानिमित्त श्रीमती नॅन्सी व पं. उद्धवबापू आपेगावकर यांच्या सेलो-पखवाज जुगलबंदीचा कार्यक्रम सोमवारी झाला. या वेळी नॅन्सी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पाश्चात्त्य संगीताची संहिता असते. ठरल्यानुसारच ते सादर होते. त्यात कलावंतांच्या स्वातंत्र्याला जागाच नसते. भारतीय शास्त्रीय संगीत मात्र निबद्ध आहे. त्यामुळे पाश्चात्त्य संगीतापेक्षा हे संगीत आपल्याला आवडते. सेलो वादनाची आवड आपल्याला मनातून आहे. बनारस येथे आपण त्याची साधना केली. आज १५ वष्रे भारतात राहिल्यानंतर आपल्याला या देशाच्या संस्कृतीविषयी आस्था वाटते, असे त्या म्हणाल्या.
शास्त्रीय संगीताच्या अध्ययन परंपरेतील गुरू-शिष्य परंपरा महत्त्वाची असून ती अन्यत्र आढळत नाही. शास्त्रीय संगीतात समर्पण वृत्तीने साधना केल्यानंतरच यश मिळते. हे खरे असले, तरी आपण लौकिक यशासाठी अथवा धनप्राप्तीसाठी या क्षेत्रात नसून केवळ आत्मानंद हीच भावना आपल्याला महत्त्वाची वाटते, असे त्या म्हणाल्या. पं. आपेगावकर यांनी पखवाज या वाद्याविषयी या वेळी माहिती दिली. आपल्याकडे केवळ आध्यात्मिक क्षेत्रात भजन, कीर्तनासाठीच हे वाद्य वाजवले जाते. प्रत्यक्षात या वाद्याची व्यापकता आणखी असून आपण अनेक वाद्यांसोबत पखवाजच्या जुगलबंदीचे कार्यक्रम देश-विदेशात सादर केले आहेत, असे ते म्हणाले. संयोजक आनंद भरोसे, शिवाजी भरोसे यांनी श्रीमती नॅन्सी व पं. आपेगावकर यांचे स्वागत केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा