या वर्षी पावसामुळे सगळीकडे दुष्काळी परिस्थिती आहे. परिसरातील सर्व जलसाठे रिकामे आहेत. त्यामुळे भविष्यात पिण्यासाठी, जनावरांसाठी पाणी व चाऱ्याची मोठी चिंता आहे. ती लक्षात घेऊन पाणी जपून वापरणे गरजेचे असताना भंडारदरा व निळवंडेच्या धरणांमधील पाण्याची वारेमाप उधळपट्टी सुरू आहे ती थांबवावी, असे आवाहन माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
धरणांमधील पाण्याच्या उधळपट्टीवरून थोरात प्रथमच आक्रमक झाले आहेत. ते म्हणाले, या वर्षीचे पहिले आवर्तन दि. १३ सप्टेंबर रोजी सुटले. त्या वेळी भंडारदरा धरणात ८ हजार ५४८ व निळवंडे धरणात ४ हजार ५२१ असे एकूण १३ हजार ६९ दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक होते. आता भंडारदरा धरणात ७ हजार ५५४ व निळवंडे २ हजार ८१९ असे एकूण १० हजार ३७३ दशलक्ष घनफूट पाणी आहे. आतापर्यंत २९ दिवसांमध्ये ५ टीएमसीपेक्षा जास्त पाण्याचा वापर झाला असून पाणी सोडणे अद्याप चालू आहे. असे किती दिवस चालणार याचा कुणालाही अंदाज येत नाही. पाणी वाया जात असताना पाणी सोडण्याचे असे बेजबाबदार नियोजन कोण करत आहे हेही समजत नाही. आतापर्यंत भंडारदरा व निळवंडेच्या पाण्याचे विधानसभा सदस्य आपसातील वाद विसरून सर्वानुमते एकत्रित बसून कालवा सल्लागार समितीच्या मार्गदर्शनाने नियोजन करण्याची परंपरा आहे. त्यामुळे अनेक वेळा कमी पाणी असताना उन्हाळय़ातही पाण्याचे व्यवस्थित नियोजन झाले आहे. याबाबत आता कुणालाही विश्वासात घेतले जात नाही. हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने हिताचे नाही.
सध्या दुष्काळाचे कोणतेही गांभीर्य न ठेवता पाण्याची वारेमाप उधळपट्टी चालू आहे. ती वेळीच थांबली पाहिजे. या वर्षीचा दुष्काळ सन १९७२ पेक्षाही भीषण आहे. त्या वेळी पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य नव्हते. या वर्षीची भूजल पातळी अतिशय खालावलेली असून, पिण्याच्या पाण्यासाठी सर्व जलस्रोत कोरडे पडले आहेत. हातपंपही बंद झाले आहेत. उच्च न्यायालयानेही त्याची गांभीर दखल घेतली आहे. परंतु आपले शासनकर्ते किंवा त्यांच्या दबावाखाली काम करणारे अधिकारी यांना या परिस्थितीचे कोणतेही गांभीर्य दिसत नाही.
भंडारदरा व निळवंडे धरणातून मराठवाडय़ासाठी जायकवाडी धरणात पाणी सोडण्याची टांगती तलवार असताना अशा प्रकारे ४ ते ५ टीएमसी पाणी एकाच आवर्तनामध्ये संपवणे कितपत योग्य आहे. भविष्यात पिण्याच्या पाण्याची स्थिती गंभीर झाल्यास त्यास जबाबदार कोण, असा सवाल थोरात यांनी केला. या पाण्याच्या उधळपट्टीचा जाब संबंधितांना द्यावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. चुकीचे नियोजन व पाणी उधळपट्टीस जबाबदार असणाऱ्यांना जनता कधीही माफ करणार नाही, असेही ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा