डिसेंबर महिन्याच्या पूर्वार्धात उबदार वातावरण अनुभवल्यानंतर राज्यात पुन्हा थंडी वाढली असून, थंड वारे सुटल्यामुळे ती अधिक बोचरी बनली आहे. मात्र, ही थंडी आता दोन दिवसांची विश्रांती घेऊन पुन्हा पुढच्या आठवडय़ात आणखी तीव्र होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यात शुक्रवारी नाशिक येथे ९.८ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली.
राज्यात या महिन्याच्या सुरुवातीला ढगाळ वातावरणामुळे तापमानात मोठी वाढ झाली होती. अनेक ठिकाणी ते सरासरीपेक्षा तब्बल ५ ते ७ अंशांनी वर गेले होते. परिणामी, उबदार वातावरणाबरोबरच उकाडासुद्धा सहन करावा लागत होता. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून उत्तरेकडील वाऱ्यांचा प्रभाव वाढल्याने पुन्हा थंडीला सुरुवात झाली. विशेषत: गुरुवारी तिचा कडाका वाढला. तो शुक्रवारीसुद्धा कायम होता. शुक्रवारी वारे सुटल्यामुळे थंडी अधिक बोचरी बनली होती.
थंडीबरोबरच राज्यात अनेक ठिकाणी गुरुवारची रात्र व शुक्रवारची सकाळ धुक्याच्या वातावरणात उजाडली. मात्र, शनिवार-रविवारी हवामान काही प्रमाणात ढगाळ असेल, असे पुणे वेधशाळेतर्फे सांगण्यात आले. त्यानंतर पुन्हा पुढच्या आठवडय़ात थंडीची तीव्रता वाढेल, अशीही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, जम्मू आणि काश्मीरमधील बहुतांश ठिकाणी गुरुवारी संध्याकाळपासून मोसमातील पहिली हिमवृष्टी झाल्याने तेथे कडाक्याच्या थंडीची लाट आली आहे. या थंडीने एका साधूचा व एका भिकाऱ्याचा बळी घेतला असून, हिमवर्षांवामुळे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. परिणामी, काश्मीरचा देशाशी संपर्क तुटला आहे.     

थंडीचा कडाका
नाशिक     ९.८
नगर     १०.४
जळगाव     १०.३
पुणे     १२.७
सांगली     १२.७
मुंबई-कुलाबा     २०.७
सांताक्रुझ     १७.६
तापमान अंश सेल्सियसमध्ये

Story img Loader