छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वात जुने व अस्सल पत्र पुण्यातील भारत इतिहास संशोधक मंडळातील अभ्यासकांच्या हाती लागले आहे. हे पत्र २८ जानेवारी १६४६ या तारखेचे असून, या पत्रात रांजे गावच्या पाटलाने स्त्रीविषयक गैरवर्तन केल्याने महाराजांनी त्याचे हातपाय तोडायची शिक्षा सुनावल्याचा उल्लेख आहे.
इतिहास अभ्यासक अजित पटवर्धन आणि डॉ. अनुराधा कुलकर्णी यांना हे पत्र भारत इतिहास संशोधक मंडळाच्या दफ्तरखान्यात ज्येष्ठ संशोधक स. ग. जोशी यांच्या नावच्या रुमालात बांधून ठेवलेले सापडले. जोशी यांना हे पत्र १९२९ साली मिळाले होते. मंडळाने ते १९३० साली ‘शिवचरित्र – साहित्य, खंड २’ या पुस्तकात प्रकाशित केले होते. त्यानंतर मात्र हे पत्र सापडत नव्हते. या पत्राची एक नक्कल १९२८ साली ‘मराठी दफ्तर, खंड ३’ मध्ये प्रकाशित झाली होती. नक्कल प्रकाशित झाल्यानंतर एका वर्षांने जोशी यांना अस्सल पत्र मिळाले.
हे पत्र नव्याने मिळाले तेव्हा त्याची अवस्था अतिशय वाईट होती. परंतु पत्रावरील शिवकालीन मोडी लिपी, मायने आणि मुद्रा पाहिल्यावर ते शिवकालीन व कदाचित शिवाजी महाराजांचेच असावे, अशी शंका पटवर्धन व कुलकर्णी यांना आली. यानंतर ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे यांच्या मार्गदर्शनाखाली या पत्राचा अभ्यास करण्यात आला.
याबाबत मेहेंदळे म्हणाले, ‘‘शिवाजी महाराजांची १६३२ व १६३८ सालची पत्रेही उपलब्ध असल्याचे दाखविले जाते. परंतु ही पत्रे नक्कल स्वरूपात असून त्यांच्या खरेपणावर विश्वास ठेवला जात नाही. १६४६ सालच्या या पत्रातील भाषा शिवकालीन असून त्यावर महाराजांचे शिक्कामोर्तब आहेत. त्यामुळे हे सर्वात जुने आणि अस्सल शिवकालीन पत्र असल्याचे सिद्ध होते. हे पत्र लिहिले गेले तेव्हा महाराजांनी वयाची सोळा वर्षेही पूर्ण केली नव्हती. पण ते राज्यकारभार सांभाळीत होते. पत्रात सुनावली गेलेली शिक्षा कठोर असली, तरी या प्रकारच्या गुन्ह्य़ाला त्या काळी अशाच शिक्षा असत. ज्या पाटलाचे हातपाय तोडण्याची शिक्षा सुनावली गेली, त्याच्या एका नातेवाइकाने पुढे येऊन त्याला सांभाळण्याची तयारी दाखवली होती. त्या नातेवाइकास पाटिलकी देण्यात आल्याचा उल्लेख या पत्रात आहे.’’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा