EY Employee Death Father Reaction : अर्न्स्ट अँड यंग (ईवाय) या बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्या सनदी लेखाकार (सीए) तरुणीचा कामाच्या अतिताणामुळे मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. ॲना सेबास्टियन पेरायिल (वय २६) असे या तरुणीचे नाव आहे. तरुणीच्या आईने कंपनीच्या अध्यक्षांना लिहिलेलं पत्र व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उजेडात आला. दरम्यान, याप्रकरणी तिच्या वडिलांनीही आता प्रतिक्रिया दिली आहे. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ईवायच्या पुणे कार्यालयात ॲना यंदा १८ मार्चला रुजू झाली होती. तिचा २० जुलैला मृत्यू झाला. तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नसले, तरी हृदयविकाराच्या झटक्याने तिचा मृत्यू झाल्याचे समजते. तिची आई अनिता ऑगस्टिन यांनी याबाबत एक सविस्तर ई-मेल ईवाय इंडियाचे अध्यक्ष राजीव मेमानी यांना पाठविला होता. तो समाजमाध्यमांत व्हायरल झाला होता. त्यात ॲनाचा कामाच्या अतिताणामुळे मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला होता. याचबरोबर ॲनाच्या अंत्यसंस्काराला कंपनीतील एकही व्यक्ती उपस्थित राहिली नसल्याकडेही लक्ष वेधण्यात आले होते. सोशल मीडियावर ही बाब पसरल्यानंतर कंपनीवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली. अनेक नेटिझन्सने कंपनीविरोधात कायदेशीर लढा देण्याचे सूचित केले आहे. मात्र, याविरोधात कोणतीही कायदेशीर पावलं उचलली जाणार नसल्याचं ॲनाच्या वडिलांनी स्पष्ट केलं आहे.

मात्र, याप्रकरणी योग्य ती चौकशी केली जाईल, असे आश्वासन केंद्रीय कामगार व रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी दिले आहे. “ॲना सेबॅस्टियन पेरायलच्या दुःखद निधनामुळे खूप दुःख झाले. कामाच्या असुरक्षित आणि शोषणाच्या वातावरणाच्या आरोपांची सखोल चौकशी सुरू आहे”, असं करंदलाजे यांनी X वर एका पोस्टमध्ये म्हटले आहे.

हेही वाचा >> EY Employee Death : कामाच्या अतिताणामुळे मृत्यू झालेल्या तरुणीच्या आईसाठी कंपनीच्या अध्यक्षांचं पत्र, म्हणाले, “मी ही एक बाप…”

ॲनाचे वडील नेमकं काय म्हणाले?

ॲनाचे वडील सीबी जोसेफ म्हणाले, “माझी मुलगी खूप सक्रिय व्यक्ती होती. ती घरी असताना बॅडमिंटन खेळत असे आणि जॉगिंग करत असे. तिने या वर्षी फेब्रुवारीमध्ये तिची सीए क्लिअर केली आणि मार्चमध्ये फर्म जॉईन केली. आम्ही तिच्याशी रोज बोलायचो आणि तिची मुख्य समस्या म्हणजे कामाचा प्रचंड ताण. ती बजाज ऑटोच्या ऑडिटमध्ये गुंतलेली होती. ती रात्री साडेबारापर्यंत काम करत राहायची.”

“तिच्या कामाच्या वेळापत्रकामुळे तिला क्वचितच झोप मिळत असे. तिला योग्य आहारही घेता येत नव्हता. ती अनेकदा याबद्दल तक्रार करत असे. त्यामुळे आम्ही तिला नोकरी सोडण्यास सांगितले. पण ती म्हणाली की ती काम करत राहील. कारण ही एक नामांकित फर्म होती”, असं जोसेफ पुढे म्हणाले.

“जुलैमध्ये आम्ही तिची भेट घेतली आणि आम्ही तिला हृदयरोगतज्ज्ञांकडे नेले आणि तपासणीनंतर त्यांनी सांगितले की माझी मुलगी पूर्णपणे निरोगी आहे आणि तिला योग्य झोप आणि योग्य अन्नाची कमतरता होती”, असंही त्यांनी सांगितलं. “माझ्या पत्नीने चेअरमनला पत्र लिहिले आहे की आमची मुलगी गेली तरी असा प्रकार इतर कोणत्याही व्यक्तीसोबत होऊ नये. आम्ही कंपनीविरुद्ध कोणतीही कायदेशीर पावले उचलणार नाही,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा >> Ashneer Grover EY story: ‘एक कोटी पगार होता, तरीही पहिल्याच दिवशी पळालो’, अशनीर ग्रोवरने सांगितला EY कंपनीतील अनुभव

हिंदूस्थान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार तिचे वडील म्हणाले, “आम्ही कायदेशीर कारवाई करणार नाही. परंतु इतर कोणाला असा त्रास होता कामा नये, असं आम्हाला वाटतं. अशा कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये सामील होणाऱ्या नवीन व्यक्तींना अशाच परिस्थितींना सामोरे जावे असे आम्हाला वाटत नाही.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ey employee death annas father reaction who died of work pressure sgk