वायुवेगाने धावणारे अश्व, त्यापैकी एकावर हातात भगवे निशाण फडकावत आरूढ झालेला स्वार, ‘माउली-माउलीं’चा भक्तांचा एकाच गलका. ‘ज्ञानबा-तुकाराम’ या जयघोषाने दमदुमलेला आसंमत. इमारती, झाडे अगदी जागा मिळेल तेथे उभारलेला भाविक अशा अतिशय भारावलेल्या व भक्तिमय वातावरणात या दोन अश्वांनी चार फे ऱ्या पूर्ण करीत जिल्ह्य़ातील पहिले गोल रिंगण पूर्ण करून भाविकांच्या डोळ्याचे पारणे फेडले.
ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा शनिवारी सायंकाळी नातेपुते येथे दाखल झाला. आज रविवारी सकाळी साडेसहा वाजता त्यांचा निरोप घेत सोहळा माळशिरसकडे मार्गस्थ झाला. सकाळी सव्वानऊ वाजता सोहळा मांडवे ओढा येथे न्याहरीसाठी विसावला. या ठिकाणी पंगती बसवल्या होत्या. जागोजागी वारक ऱ्यांची भजने, टाळ-मृदंगांच्या आवाजाने आसमंत भारावला होता. दुपारी १२ च्या सुमारास सोहळा भाविकाचा पाहुणचार स्वीकारत पुढे मार्गस्थ झाला. दीडच्या सुमारास सोहळा सदाशिवनगर येथील श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या रिंगणस्थळावर पोहोचला. या ठिकाणी असणारे अतिक्रमण हटवल्याने रिंगणासाठी प्रशस्त जागा झाली होती. रिंगणस्थळी टाळकरी, विणेकरी, तुळशीहंडा घेतलेल्या महिला पताकाधारींच्या प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर माजी सहकार राज्यमंत्री प्रतापसिंह मोहिते पाटील, त्यांच्या पत्नी पद्मजादेवी मोहिते पाटील, श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांनी अश्वाची पूजा केल्यानंतर अश्वांनी प्रदक्षिणा घातली. व अश्वांच्या रिंगणास सुरुवात झाली. चोपदाराने रिंगण लावताच भगवे निशाण हातात घेऊन फडकावणाऱ्या स्वाराचा अश्व उधळला. परंतु तेवढय़ाच चपळाईने देवाच्या अश्वाने त्याचा पाठलाग केला. डोळ्याचे पाते लवण्याच्या आत अश्वांची फेरी पूर्ण होत होती. दोन्ही अश्वांनी ४ फे ऱ्या पूर्ण केल्या आणि भाविकांनी माउली-माउली, ज्ञानबा-तुकाराम चा जयघोष केला.
अश्वांच्या टापाखालची माती उचलून कपाळाला लावण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती. रिंगणानंतर याच ठिकाणी भक्तांनी झिम्मा, फुगडी, मनोरे असे खेळ मांडले. काही जण जमिनीवर गडगडा लोळत लोटांगण घालत होते. महिला-पुरुष मिळून फुगडय़ा खेळत होते. या ठिकाणी श्री शंकर सहकारी साखर कारखान्याने सोहळ्यातील भाविकांसाठी भोजनाचे आयोजन केले होते. त्याचा लाभ घेतलेले भाविक दिंडय़ा पुढे हळूहळू मार्गस्थ होते. ४ वा सोहळा पुरंदावाडे ओढय़ात विसावला. परिसरातील मेडद, तिरवंडी, येळीव, जाधववस्ती, कण्हेर या भागातील लोकांनी या ठिकाणी अन्नदानांचा व माउली दर्शनाचा लाभ घेतला. जवळच असणाऱ्या काळा मारुती या देवस्थानच्या दर्शनाचाही लाभ भाविकांनी घेतला व सोहळा पुढे मार्गस्थ झाला.
माळशिरस ग्रामपंचायतीने शहराच्या प्रवेशद्वाराजवळच सोहळ्याचे स्वागताची तयारी केली होती. सरपंच माणिक वाघमोडे, त्यांचे सहकारी व ग्रामस्थांनी माउलींचे स्वागत केले. सर्व दिंडी प्रमुखांना मानाचा नारळ दिला व सोहळा पुढे जुन्या पालखी मार्गाने म्हणजे माळशिरस गावच्या पेठेतून पुढे मारुती मंदिराजवळ निघाला व पूर्वेच्या मुक्कामस्थळावर सायंकाळी ७ च्या सुमारास पोहोचला. रात्री आरती झाल्यानंतर उशिरापर्यंत दर्शनरांगा सुरू होत्या. वारकरी भजन, कीर्तन प्रवचनात दंग होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा