छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते. स्वराज्य रक्षक ही उपाधी त्यांच्या नावापुढे लावण्यात आली आणि तिच योग्य आहे असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं होतं. त्यावरून उमटणारे पडसाद थांबताना दिसत नाहीत. तोच राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेब हा हिंदू द्वेष्टा नव्हता असं म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून चांगलाच वाद पेटण्याची चिन्हं आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हटलं आहे जितेंद्र आव्हाड यांनी?

“छत्रपती संभाजी महाराजांना आम्ही पहिल्यापासूनच स्वराज्य रक्षक म्हणतो. ते संगमेश्वरला सरदेसाईंच्या वाड्यात होते. ही बातमी औरंगजेबाला दिली कुणी? इथेच तर खरा इतिहास आहे. छत्रपती संभाजी महाराजांना बहादुरगडावर नेण्यात आलं तिथे त्यांचे डोळे काढण्यात आले. त्या ठिकाणी बाजूला विष्णूचं मंदिर आहे. औरंगजेब क्रूर आणि हिंदूद्वेष्टा असता तर त्याने विष्णूचं मंदिरही फोडलं असतं. तिथून छत्रपती संभाजीराजेंना तुळापूरला नेण्यात आलं. त्यानंतर पुढे काय झालं तो इतिहास सगळ्यांनाच माहित आहे. त्यामुळेच मी म्हणतो आहे की उगाच नको त्या इतिहासात जाऊ नका. इतिहास वाद वाढवतो.”

हेही वाचा – “शेंबडं पोरगंसुद्धा…”, सावरकर आणि गोळवलकरांबाबतच्या ट्वीटनंतर जितेंद्र आव्हाड ट्रोल

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी हे वक्तव्य केलं त्यावरून आता नवा वाद पेटण्याची चिन्हं आहेत. महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी छत्रपती संभाजीराजे हे धर्मवीर नव्हते. त्यांना काही कारण नसताना धर्मवीर ही उपाधी लावली जाते त्यांना स्वराज्य रक्षकच म्हटलं पाहिजे तेच योग्य आहे असं म्हटलं होतं. त्यावरून सत्ताधाऱ्यांच्या हाती आयताच मुद्दा मिळाला होता. आता जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेब हा हिंदूद्वेष्टा नव्हता असं म्हटलं आहे. त्यामुळे नवा वाद पेटण्याची शक्यता आहे

जितेंद्र आव्हाड यांनी संभाजीराजेंबाबत केलेलं ट्विटही चर्चेत

शंभू राजे स्वराज्य रक्षक आणि धर्म रक्षकही जे स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेसाठी निर्माण केलं. त्यांना धर्म म्हणजे महाराष्ट्र धर्म सगळ्यांना सामावून घेणारा धर्म अभिप्रेत होता. त्यामुळे स्वराज्य आणि धर्म बाजूला कसे काढता येतील असं ट्विटही त्यांनी केलं होतं. तसंच वीर सावरकर आणि माधव गोळवलकर यांनी छत्रपती संभाजी यांच्या विषयी काय लिहून ठेवलं आहे हे वाचा. शूर वीरास बदनाम करण्याचं काम एका वर्गाकडून अनेकदा झालं आहे असाही आरोप जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमधून केला होता. आता काही वेळापूर्वीच पत्रकारांशी संवाद साधत असताना औरंगजेब हिंदू द्वेष्टा नव्हता असं त्यांनी म्हटलं आहे. तसं असतं तर औरंगजेबाने ज्या ठिकाणी छत्रपती संभाजीराजेंचे डोळे काढले तिथे विष्णूचं मंदिर आहे तेदेखील फोडलं असतं असंही आव्हाड म्हणाले आहेत.

आणखी वाचा – “जितेंद्र आव्हाडांनी आता औरंगजेबाचं मंदिर उभारावं आणि उद्घाटनाला अजित पवार…” नरेश म्हस्केंचा खोचक सल्ला

धर्मवीर आणि स्वराज्य रक्षक या वादावर काय म्हटलं आहे जितेंद्र आव्हाड यांनी?

छत्रपती संभाजी महाराजांच्या धर्मवीर आणि स्वराज्य रक्षक यावरून बरीच वादावादी झाली आहे. खरंतर निष्कारण हा वाद काढण्यात आला. शिवाजीराजेंच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र संभाजीराजे हे गादीवर बसले. त्यानंतर त्यांनी शिवाजी महाराजांच्या परंपरेनुसार ते पुढे जात होते. शिवाजी महाराजांनी धर्म ही व्याख्या महाराष्ट्र धर्म, मराठा धर्म आणि स्वराज्य अशा तिघांत विणलेली होती. मराठा हा व्यापक शब्द होता. त्यात सगळे समाविष्ट होते. त्यामुळेच राज्याला रयतेचं राज्य म्हटलं गेलं. त्या रयतेच्या राज्याचे वारसदार होते संभाजी महाराज. त्यामुळे ते कुठल्या एका धर्माच्या रक्षणासाठी बाहेर पडले असा कुठलाही ऐतिहासिक संदर्भ नाही. समकालीन जेवढे इतिहासकार आहेत त्यामध्ये परराष्ट्रातून आलेले इतिहासकारांनी संभाजी महाराजांबद्दल खूप चांगलं लिहून ठेवलं आहे.

आणखी वाचा – संभाजी महाराज ‘धर्मवीर’च, अजित पवारांचा मुद्दा चुकीचा; संभाजीराजे छत्रपती यांचे वक्तव्य

संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक होते. स्वराज्यामध्ये सगळाच समाज आला. कुठल्याही प्राचीन इतिहासकारांनी त्यांना धर्मवीर असं कुठेही म्हटलेलं नाही. धर्माचं रक्षण म्हणजेच स्वराज्याचं रक्षण हीच शिवाजी महाराजांची आणि संभाजी राजांची भावना होती असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांची टीका

आज हे नक्की झालं की राष्ट्रवादी काँग्रेस हा राष्ट्रवादी नाही तर औरंगजेबाची आजची पार्टी आहे. शरद पवार छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हणू नका म्हणतात. अजित पवार म्हणतात छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नाहीत आणि आता जितेंद्र आव्हाड हे औरंगजेबाचं कौतुक करतात. असं ट्विट करत केशव उपाध्ये यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: F aurangzeb was cruel and hindu hater he would have destroyed the vishnu temple jitendra awadas statement may marks a new controversy scj