‘फेसबुक- अवघड खूप’, हा विचार सध्या पोलीस दलात बळावतो आहे. औरंगाबाद पोलीस आयुक्तांनी तर ‘फेसबुक’सह इतर ‘सोशल नेटवर्किंग साईट’वर नजर ठेवण्यासाठी तीन कर्मचाऱ्यांची विशेष नियुक्ती केली आहे. हे कर्मचारी दररोज सकाळी आक्षेपार्ह मजकूर काढून टाकतात. काही गंभीर प्रकरणांत कारवाई केली जाते.
सोशल नेटवर्किंग साईटच्या अनुषंगाने औरंगाबादेत आतापर्यंत २५ गुन्हे दाखल झाले आहेत. दर महिन्याला किमान १०-१५ तक्रारी फेसबुकशी संबंधित असल्याने स्वत:चा मिनिटामिनिटाचा कार्यक्रम फेसबुकवर देऊ नका, असे आवाहन पोलीस आयुक्त संजयकुमार यांनी केले आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर पाळण्यात आलेल्या ‘बंद’च्या विरोधात मजकूर लिहिल्याच्या कारणावरून ठाण्यात दोन युवतींना अटक झाली. ही कारवाई करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले. या घटनेवर पडदा पडतो न पडतो तोच मराठवाडय़ात परळी येथे आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याने बुधवारी वातानुकूलित बस समाजकंटकांनी जाळून टाकली. फेसबुकवर अश्लील छायाचित्रे देण्याच्या तक्रारी तर खूपच असल्याचे पोलीस सांगतात.
साहजिकच सोशल नेटवर्किंग साईटवर लक्ष ठेवणे हे पोलिसांसाठी मोठेच काम होऊन बसले आहे. या विषयावर पोलीस आयुक्त संजयकुमार म्हणाले, की ज्यांच्याशी आपण जोडलेलो असतो, ते खरेच मित्र आहेत का, हे तपासण्याची प्रत्येकाला गरज आहे. फेसबुकचा गैरवापर केल्याबद्दल औरंगाबाद शहरात पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तर सहा गुन्हे धार्मिक भावना दुखावणारे आहेत.
गेल्या काही दिवसांत सायबर गुन्हय़ांमध्ये वाढ होत असून, दररोजच्या कायदा व सुव्यवस्थेच्या कामाचा भाग म्हणून सोशल नेटवर्किंगकडेही पोलिसांना जाणीवपूर्वक लक्ष द्यावे लागत आहे. मध्यंतरी आसामचा प्रश्न चिघळल्यानंतर काही चित्रफिती जाणीवपूर्वक सोशल नेटवर्किंग साईटवर टाकण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. सर्वसामान्यांपर्यंत या चित्रफिती पोहोचू नये यासाठी त्या दिसणार नाहीत, याची व्यवस्था पोलीस करीत होते. आता तर दररोज त्यांनी कोणत्या प्रकारचा मजकूर तसेच छायाचित्रे काढून टाकावीत, याबाबतही कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. आक्षेपार्ह मजकूर लिहिणाऱ्या व्यक्तीचे आय. पी. अ‍ॅड्रेस शोधून काही वेळा पोलीस अशा तरुणांना बोलावून घेतात. त्यांना समज देऊन सोडून दिले जाते. काही तक्रारी मात्र गुन्हे स्वरूपात नोंदविण्यात आल्या आहेत. विशेषत: लॉटरी स्वरूपातील तक्रारीही अधिक असल्याचे आयुक्त संजयकुमार यांनी सांगितले. 

Story img Loader