परळीहून त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या वातानुकूलित बसला अडवून १५ ते २० जणांनी पेट्रोल टाकून पेटवून दिले. परळी शहराजवळील शामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपुलावर ही घटना घडली. बसच्या चालकासही दगडाने मारहाण केली. बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परळी शहरात तणावाचे वातावरण होते. याच टोळक्याने अन्य एका बसवरही दगडफेक केली. फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर आल्यामुळे १५ ते २० जणांच्या जमावाने हे कृत्य केल्याचे समजते.
परळी पोलिसांनी सांगितले, की परळी आगारातून त्र्यंबकेश्वरकडे सकाळी ६ वाजून पाच मिनिटांनी (एमएच ०६ सी ९२०६) ही वातानुकूलित बस सोडण्यात आली. सकाळीच या बसला थांबवून चालक बाबासाहेब दादा भिसे याला मारहाण करण्यात आली. प्रवाशांना खाली उतरवून बसवर पेट्रोल टाकून ती जाळण्यात आली. याच जमावाने परळी आगारातील अन्य एका बसवरही दगडफेक केली. बसला आग लावल्याचे कळताच वाहतूक नियंत्रक नंदकिशोर कदम यांनी अग्निशामक दलास बोलावले. तोपर्यंत बस जळाली होती. या घटनेची फिर्याद बसचे चालक बाबासाहेब भिसे यांनी परळी पोलीस ठाण्यात दिली आहे. या प्रकारानंतर परळी आगारातून सुटणाऱ्या सर्व बसची वाहतूक बंद करण्यात आली. त्यामुळे श्रीक्षेत्र कपिलधार येथील मन्मथ स्वामींच्या यात्रेसाठी आलेले भाविक परळीत अडकून पडले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा