मुलींनी आई-वडिलांच्या संस्काराखाली वावरताना धर्माची नीतिमूल्ये जोपासावीत. संस्काराची पायरी ओलांडू नये. फेसबुक व मोबाइल ही विज्ञानाची चांगली साधने असली, तरी त्याचा वापर चुकीच्या पद्धतीने चालला आहे. एकंदरच सामाजिक वातावरण पाहता प्रतापी संस्कार सोहळय़ातून बाहेर जाताना प्रत्येकीने पाश्चात्त्य संस्कृतीचे अनुकरण करणार नसल्याचा संकल्प सोडावा, असे आवाहन ज्येष्ठ व्याख्यात्या अॅड. अपर्णा रामतीर्थकर यांनी केले.
राज्य व्यसनमुक्त युवक संघाच्या महिला आघाडीतर्फे कार्वे येथील महिला प्रतापी संस्कार सोहळय़ात माणदेशी महिला सहकारी बँकेच्या संस्थापिका चेतना सिन्हा यांना‘राणी लक्ष्मीबाई पुरस्कार’ प्रदान करण्यात आला, या प्रसंगी त्या बोलत होत्या. युवकमित्र हभप बंडातात्या कराडकर, व्यसनमुक्ती युवक संघाचे राज्याध्यक्ष विलासबाबा जवळ, सचिन शिंदे, महिला आघाडीच्या अध्यक्षा सुनीता शिंदे उपस्थित होत्या. संपूर्ण ज्ञानेश्वरी ग्रंथ सुवाच्य अक्षरात लिहिल्याबद्दल ताई शेलार यांचा सुनीता शिंदे यांच्या हस्ते या वेळी सत्कार करण्यात आला.
अॅड. रामतीर्थकर म्हणाल्या, की हल्लीची पिढी समाजव्यवस्थेची नीतिमूल्ये पायदळी तुडवत आहे. अशा परिस्थितीत मुलींनी भावुक न होता आपल्या संस्कृतीचे काटेकोरपणे पालन करावे, तसे झाले तरच अन्याय व अत्याचार कमी होतील. त्यासाठी मुलींनी धर्मावर प्रेम करावे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
चेतना सिन्हा म्हणाल्या, की माझा आजचा हा सन्मान ख-या अर्थाने खडतर प्रवास करून पुढे येणा-या ग्रामीण महिलांचा आहे. व्यसनमुक्तीच्या कार्यात येणे हे फार कठीण व अवघड असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.  
बंडातात्या कराडकर म्हणाले, की फॅशनच्या कात्रीमध्ये महिलावर्ग सापडला असताना, समाजासमोर आदर्श ठेवण्यासाठीच या पुरस्काराचे आयोजन आहे. अॅड. अपर्णा रामतीर्थकर व चेतना सिन्हा यांची साधी राहणी तसेच उच्च विचारसरणीचा आदर्श घ्यावा. प्रास्ताविक सुनीता शिंदे यांनी केले.
 

Story img Loader