पंढरपूर : पंढरीचा विठूराया जरी गरिबांचा देव म्हणून परिचित असला तरी आता नवतंत्रज्ञानामुळे ‘हायटेक’ बनत आहे. विठ्ठल-रखुमाईची नित्यपूजा, पाद्यपूजा, तुळशी पूजा, चंदन उटी पूजा इत्यादी पूजा मंदिर समितीकडून उपलब्ध करून देण्यात येत आहेत. मात्र काही देश विदेशातील भाविकांसाठी मंदिर समितीने देवाच्या पूजेबाबत ‘ऑनलाईन बुकिंग’ची सोय उपलब्ध करून दिली आहे. येत्या १ ऑक्टोबरपासून या पूजेसाठी संबंधित संकेतस्थळावरून नोंद करता येणार असल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली आहे.

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री विठ्ठल रखुमाईचे दर्शन आता सुलभ झाले आहे. त्याच बरोबरीने आता देवाची विविध होणारी पूजा देखील आता घरबसल्या आपल्याल्या पाहिजे त्या दिवशी करता येऊ शकते. यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने एक संगणकीय प्रणाली विकसित केली आहे. पूजेच्या नोंदणीसाठी https://www.vitthalrukminimandir.org या मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावरून नोंदणी करता येणार आहे. या संकेतस्थळावर तारीख वार, तिथी दिसणार आहे. ज्यांना पूजा नोंदणी करायची आहे. त्यानुसार नोंदणी करता येणार आहे. नोंदणी १ ऑक्टोबरपासून सुरु केली जाणार मात्र लगेच भाविकांना पूजेसाठी येता येणार नाही म्हणून ७ ऑक्टोबरपासूनच्या पूजेची नोंदणी करता येणार आहे. तसेच गर्दीच्यादिवशी या ऑनलाइन पूजा बंद राहतील, अशी माहिती शेळके यांनी दिली आहे.

हेही वाचा >>>स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करणाऱ्या बापास बारा वर्षाची सक्त मजुरी !

या ऑनलाइन नोंदणीसाठी काही अडचणी आल्यास मंदिर समितीच्या नित्योपचार कार्यालयातून नोंदणी करून देण्यास मदत व आवश्यक ते मार्गदर्शन करण्यात येईल. याबाबतची अधिक माहिती, अटी व शर्ती मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच अधिक माहितीसाठी मंदिर समितीच्या ०२१८६-२९९२९९ या दूरध्वनी क्रमांकावर भाविकांनी संपर्क साधावा असे आवाहनही कार्यकारी अधिकारी शेळके यांनी केले आहे. एकंदरीत भाविकांना सावळ्या विठुरायाचे दर्शन आणि पूजेसाठी मंदिर समितीने पारदर्शक उपक्रम आणि सध्याच्या काळातील सहज करता येणारी पद्धत अवलंब केल्याने भाविकांना फायदा होईल.