पर्यटन विकासाबरोबरच आरोग्यसह विविध क्षेत्रांत उच्च दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न प्रशासन करीत आहे. जिल्ह्य़ातील रुग्णांच्या सोईसाठी येत्या काळात कर्करोगासाठी अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी केले.
चिपळूण येथे आयोजित रत्नागिरी पर्यटन महोत्सव २०१६ अंतर्गत महोत्सवस्थळी आयोजित आरोग्य शिबीर उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. चिपळूणच्या नगराध्यक्षा सावित्री होमकळस, खासदार हुसेन दलवाई, चिपळूणचे आमदार सदानंद चव्हाण, प्रभारी जिल्हाधिकारी सारंग कोडोलकर, चिपळूणचे उपविभागीय अधिकारी रवींद्र हजारे, माजी आमदार रमेश कदम, पंचायत समिती सभापती स्नेहा मेस्त्री, माजी आमदार बापूसाहेब खेडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्वाच्या सहकार्यातून कोकणचा वेगवान विकास शक्य आहे, असे सांगून वायकर म्हणाले, पर्यटन महोत्सव करतानाचा इतर उपक्रमांचे आयोजन करून महोत्सव र्सवकष करण्याचा प्रयत्न केला आहे. याचाच एक भाग म्हणून आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराच्या माध्यमातून आरोग्यविषयी तपासण्या करून रुग्णांना आवश्यक उपचार उपलब्ध करून दिले जाणार आहेत. तसेच शिबिरात नोंदणी होणाऱ्या अपंगांना अत्याधुनिक व्हीलचेअर दिल्या जाणार आहेत. आवश्यकता असणाऱ्या रुग्णांना चष्मे देण्यात येणार आहे. तसेच कॅड्रेक, फाटलेले ओठ असणाऱ्या रुग्णांचे शस्त्रक्रिया मोफत करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. तसेच आरोग्य शिबिराचे आयोजन यशस्वी करणारा आरोग्य विभाग आणि सहकार्य करणाऱ्या संस्थांचे पालकमंत्री यांनी कौतुक केले. या वेळी खासदार दलवाई व आमदार चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले.
रत्नागिरी पर्यटन महोत्सावानिमित्त कृषी विभागामार्फत आयोजित कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी पालकमंत्री वायकर यांनी अत्याधुनिक शेतीची माहिती देणाऱ्या स्टॉलना भेट दिली. तसेच यानंतर महोत्सव परिसरातील आंबा स्टॉललादेखील पालकमंत्र्यांनी भेट दिली. महोत्सव स्थळी पर्यटकांना हापूस आंब्यासह कोकण मेव्याची चव चाखता यावी याकरिता २० स्टॉल उभारण्यात आले आहेत.
यानंतरच्या सत्रात पालकमंत्री वायकर यांनी महोत्सव कालावधीत आयोजित स्कुबा डायव्हिंग, झिपलाईन, जेटस्की, रॅपिलग अशा साहसी खेळांचे, रॉक क्लायम्ब्िंाग, क्रोकाडइल सफारी- बोटिंग या उपक्रमाचे, तसेच रेडीज फार्म येथे आमराई सफारी या उपक्रमांचे उद्घाटन करण्यात आले. तसेच, दरम्यान बांगडा शिल्पाचे अनावरण करण्यात आले. सर्व कार्यक्रमांना स्थानिकांबरोबर पर्यटकांनीही मोठय़ा संख्येने हजेरी लावली.
रत्नागिरीत कॅन्सर रुग्णांसाठी सुविधा – वायकर
पर्यटन विकासाबरोबरच आरोग्यसह विविध क्षेत्रांत उच्च दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न प्रशासन करीत आहे.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 08-05-2016 at 01:37 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Facilities for cancer patients in ratnagiri