न्यायालयात याचिका दाखल; सरकारी विभागांना नोटिसा
औरंगाबाद : पाणीपुरवठा आणि स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी परतूर तालुक्यातील चतुर्वेदेश्वर साखर कारखान्यासाठी घेतलेली सुमारे ५० एकर जमीन स्वत:च्या नावावर करून घेतल्याचा आरोप करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली आहे.
परतूर तालुक्यातील रायगव्हाण येथील बळीराम अश्रुबा कडपे यांनी दाखल केलेल्या याचिकेत जमीन प्रकरणात कारखान्याचे नाव बदलून मंत्री लोणीकर यांनी मालकी मिळविल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी उच्च न्यायालयाने गृह सचिव, सहकार सचिव यांच्यासह सरकारी यंत्रणेला म्हणणे सादर करण्याची नोटीस बजावण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.
चतुर्वेदेश्वर साखर कारखान्याचे मुख्य प्रवर्तक म्हणून मंत्री बबनराव लोणीकर यांनी आमदार असताना म्हणजे सन २००० मध्ये साखर कारखाना काढण्याचे ठरविले. या भागातील शेतकऱ्यांकडून पाच हजार रुपयांपर्यंतचे शेअर्स भागभांडवल जमा केले. जमलेल्या रकमेतून लोणी परिसरात कारखान्यासाठी जमीन विकत घेण्यात आली. मात्र, या कारखान्याची कोणतीही नोंद सहकार विभागाकडे व प्रादेशिक सहसंचालक साखर यांच्याकडे केली नाही. तशी कागदपत्रे याचिकाकर्ते कडपे यांनी माहिती अधिकारात मिळविल्याचा दावा याचिकाकर्तानी केला आहे. कारखान्यांची नोंदणी न करताच शेअर्स गोळा करण्यासाठी पावत्या छापून त्याआधारे रक्कम गोळा केली. जमीन खरेदी केली. मात्र, नंतर ही जमीन बबनराव लोणीकर यांनी स्वत:च्या व मुलाच्या नावे करून घेतली. दस्त नोंदणी व अन्य कागदपत्रांच्या आधारे याचिकाकर्त्यांनी पोलीस अधीक्षकांकडेही तक्रार दाखल करण्याची विनंती केली होती. मात्र, त्याकडे पोलीस अधीक्षकांनी लक्ष दिले नाही. त्यामुळे न्याय मिळावा म्हणून ही याचिका दाखल करण्यात आल्याचे याचिकेमध्ये नमूद करण्यात आले आहे.
ही तक्रारच बनावट आहे. साखर कारखान्याचे शेअर्स घेतल्यानंतर पुरेसे भागभांडवल न जमल्याने शेतकऱ्यांची रक्कम त्यांना परत करण्यात आली आहे. यात कोणताही गैरव्यवहार झालेला नाही.
– बबनराव लोणीकर, मंत्री पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग